अनंत चतुर्दशीपासून राज्यव्यापी ‘विजय यात्रा’

आमदार सरदेसाई यांची घोषणा : गोमंतकीयांनी ‘हायकमांड’ बनावे
मडगाव : गोमंतकीय जनतेने आपण हायकमांड राहणार याची खात्री करावी, दिल्लीचे हायकमांड गोवा संपवणार आहे. त्यासाठी 2027 चे सरकार आम्ही घडविणार आहोत. यासाठी आम्ही तयारी केली आहे. त्यासाठी गोमंतकीयांचा पाठिंबा पाहिजे. ज्यांना भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही बदल घडविण्यासाठी अनंत चतुर्दशीपासून गोवाभर विजय यात्रा काढणार आहोत, अशी घोषणा फातोर्डाचे आमदार व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी रविवारी आपल्या वाढदिन सोहळ्यात बोलताना केली.
गोव्यात प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे आणि जातीय तेढ निर्माण करून तसेच ध्रुवीकरण करून निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत, असा आरोप सरदेसाई यांनी केला. गोव्यात गोमंतकीय शिल्लक राहणे सोडाच पाण्याला देखील आम्ही मोताद होणार आहेत. राज्यात कोळसा प्रदूषण सुरू आहे. अदानीना मुख्यमंत्री अडवू शकत नाही. तसे केले तर त्यांची खुर्ची जाण्याची भीती आहे. भाजप कोळसा पार्टी आहे आणि त्यांना हटवलेच पाहिजे. दाबोळी विमानतळाचे भवितव्यही अधांतरी आहे, अशी टीका त्यांनी केली. सरकारचा ‘इव्हेंट’च्या माध्यमातून भ्रष्टाचार चालू आहे. आपण 25 लाखांना ‘अभंग रिपोस्ट’ कार्यक्रम केला, तर सरकार त्याच कार्यक्रमासाठी 2 कोटी रु. खर्च करते, असा आरोप त्यांनी केला.
नव्या क्रांतीसाठी सरदेसाईंनी पुढाकार घ्यावा : फा. फेर्रांव
गोव्याचा सांभाळ विजय सरदेसाई करू शकतात त्यासाठी नव्या क्रांतीची गरज असून आमदार सरदेसाई यांनी त्यासंदर्भात पुढाकार घ्यावा, असे आवाहन फा. व्हिक्टर फेर्रांव यांनी यावेळी बोलताना केले. गोव्यात आम्ही शेवटचे गोमंतकीय ठरणार काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून गोमंतकीयांनी जागे होऊन गोवा वाचविण्याची गरज त्यांनी प्रतिपादली.
गोमंतकीयांनी सरदेसाईंच्या पाठीमागे उभे रहावे : सिंग
पंजाबचे चार वेळचे आमदार जीत मोहिंदर सिंग यांनी आमदार सरदेसाई यांचा जनतेशी ‘कनेक्ट’ वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. ते फातोर्डा मतदारसंघापुरता मर्यादित नाहीत. राज्यभरातील त्यांच्या कार्याचा व्याप आदर्शवत आहे. विजय हे गोव्याचे भविष्य असून त्यांनी गोव्याच्या भल्यासाठी आवश्यक पावले उचलावीत आणि येथील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. विजय सरदेसाई हे अभ्यासू नेते असून गोव्याचे प्रश्न पोटतिडकीने विधानसभेत ते मांडतात. सरदेसाई हे राष्ट्रव्यापी ताकद असलेले नेते आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील माजी आमदार अनिल कदम यांनी केले.
आम्ही वाट पाहत बसू शकत नाही : नाईक
आम्हाला मुख्य विरोधी पक्षाचे कोण लपाछपीचा खेळ खेळतात त्याची काळजी नाही. त्या पक्षाचे काही नेते शुभेच्छा देऊन गेले आहेत. आपल्या पक्षाने नेहमीच हात पुढे केलेला आहे. मात्र आम्ही वाट पाहत बसू शकत नाही, असे सांगून काँग्रेसकडून निर्णय घेण्यासाठी होणाऱ्या विलंबाविषयी गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुख्य प्रवत्ते प्रशांत नाईक यांनी अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली. गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवत्ते प्रा. राजेश कळंगुटकर यांनी यावेळी बोलताना जर आमचे सरकार आले, तर ‘39-अ’ सहा महिन्यांत रद्द करण्यात येईल असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे, असे सांगितले. गोवा आणि गोव्याची अस्मिता सांभाळण्याची गरज असून त्यासाठी दक्षिण ते उत्तरपर्यंत ‘विजय यात्रा’ काढण्याचे आवाहन पक्षाचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष दीपक कळुंटकर यांनी केले. दैवज्ञ समाज अध्यक्ष रमाकांत रायकर, माजी नगरसेविका निमिषा फालेरो, किरण नायक, ‘आप’चे वाल्मिकी नाईक व अन्य पदाधिकारी, केळशीचे सरपंच डिक्सन वाझ, अॅड. प्रतिमा कुतिन्हो, माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनी यावेळी भेट देऊन सरदेसाई यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवस कार्यक्रम सुरू असताना कळंगूटचे भाजप आमदार मायकल लोबो यांनी व्यासपीठावर येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. एल्विस गोम्स हेही याप्रसंगी उपस्थित होते.
Source link



