Uncategorized

शिवकुमार बुधवारी मुख्यमंत्रिपदी आरुढ

लोकभवनमध्ये शपथविधी कार्यक्रम : काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड : आता मंत्र्यांच्या निवडीसाठी कसरत

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

कनकपूर मतदारसंघातून सातत्याने विधानसभेवर विजयी झालेले आणि काँग्रेसमध्ये ‘ट्रबल शूटर’ म्हणून ओळखले जाणारे डी. के. शिवकुमार हे अखेर कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. ते बुधवार दि. 3 जून रोजी सायंकाळी 4.05 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. लोकभवनमध्ये साधेपणाने हा कार्यक्रम होणार असून राज्यपालांनी यासंबंधीचे पत्रकही जारी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबरच मंत्री म्हणून कोणकोण शपथग्रहण करतील, याविषयी आता कुतूहल निर्माण झाले आहे.

राज्य राजकारणातील नेतृत्व बदलाविषयी असणाऱ्या गोंधळावर अखेर पडदा पडला आहे. शनिवारी डी. के. शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यासमवेत सिद्धरामय्या यांच्यासह अनेकांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा औपचारिक दावा केला. राज्यपालांनीही त्यावर संमती दर्शविली आहे.

मंगळवार 26 मे नवी दिल्ली येथे झालेल्या मॅरेथॉन बैठकीत काँग्रेसश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनेनुसार सिद्धरामय्या यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नवे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी शनिवारी सायंकाळी 4 वाजता विधानसौधमध्ये काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्याच्या निवडीचा ठराव राष्ट्रीय काँग्रेस समितीच्या विवेकाधीन ठेवण्यात आला आहे, असा एक ओळीचा ठराव मांडला. त्याला डॉ. परमेश्वर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्व काँग्रेस आमदारांनी हात उंचावून पाठिंबा दिला. नंतर वेणुगोपाल यांनी 10 मिनिटे बैठक तहकूब केल्याचे सांगितले. त्यानंतर सिद्धरामय्या, वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला बैठकीतून उठून मुख्यमंत्री कार्यालयात गेले. 10 मिनिटानंतर पुन्हा बैठकीत सामील झाले. त्यानंतर के. सी. वेणुगोपाल यांनी शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.

सिद्धरामय्यांच्या अभिनंदनाचा ठरावही संमत

विधिमंडळ पक्षनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळातील सेवेबद्दल अभिनंदन करण्याचा ठराव मांडून सभेचा पाठिंबा मागितला. सभेने त्याला एकमताने पाठिंबा दिला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर डी. के. शिवकुमार यांच्यासोबत सिद्धरामय्या, काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला हे एकाच कारमधून निघून गेले हे विशेष.

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम होणार साधेपणाने

प्रथमच मुख्यमंत्रिपदी आरुढ होत असलेले डी. के. शिवकुमार यांनी कोणताही थाटमाट न करता अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला विधानसौधसमोर हा कार्यक्रम भव्यदिव्य स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हायकमांडच्या निर्देशांनुसार त्यांनी हा निर्णय बदलला. बेंगळूरमधील सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येऊ नये तसेच मोठ्या प्रमाणावर पैशांचा अपव्यय न करता लोकभवनमधील ग्लासहाऊसमध्ये शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती काँग्रेस नेते जी. सी. चंद्रशेखर यांनी दिली.

 

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीही घेतली राज्यपालांची भेट

राज्याच्या नूतन मुख्यमंत्र्यांच्या पदग्रहण कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी डी. के. शिवकुमार यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी म्हणजेच सकाळी 10:30 वाजता शिवकुमार यांनी बंधू व माजी खासदार डी. के. सुरेश यांच्यासमवेत लोकभवनमध्ये राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शपथविधी कार्यमाची तारीख कळवल्याचे समजते.

राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा

काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी सरकार स्थापनेचा औपचारिक दावा करण्यासाठी सायंकाळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. त्यांनी राज्यपालांना आपल्याला सर्व आमदारांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापनेला परवानगी देण्याची विनंती केली. यावेळी राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी डी. के. शिवकुमार यांना निमंत्रण दिले. याप्रसंगी शिवकुमार यांच्यासोबत सिद्धरामय्या, डॉ. जी. परमेश्वर, ईश्वर खंड्रे, एम. बी. पाटील, के. एच. मुनियप्पा देखील उपस्थित होते.

काँग्रेस विधिमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर आता नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. 3 जून रोजी मुख्यमंत्र्यांसोबत 10 ते 12 आमदार मंत्रिपदी शपथबद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संभाव्य मंत्र्यांबाबत काँग्रेसमध्ये वरिष्ठांसोबत खलबते सुरू आहेत. डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ नेत्यांकडे आपल्या निकटवर्तीयांची यादी दिली असून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी केली आहे. अखेर मंत्रिपदे कोणाला द्यावीत, याबाबत हायकमांड अंतिम निर्णय घेणार आहे. शिवकुमार यांनी पहिल्या टप्प्यात ज्येष्ठांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याची तयारी चालविली आहे. राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीनंतर दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पहिल्या टप्प्यात शपथबद्ध होणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी

डॉ. जी. परमेश्वर

के. जे. जॉर्ज

सतीश जारकीहोळी

प्रियांक खर्गे

लक्ष्मी हेब्बाळकर

यतिंद्र सिद्धरामय्या

जमीर अहमद खान

चेलुवरायस्वामी

यु. टी. खादर

दिनेश गुंडूराव

कृष्णभैरेगौडा

एन. ए. हॅरिस

योग्य फळ मिळण्याची आशा!

नव्या मंत्रिमंडळात मला उपमुख्यमंत्रिपद द्यावे, अशी वीरशैव लिंगायत समुदायाची इच्छा आहे. यावेळी लिंगायत समुदायातून 36 जण आमदार बनले असून त्यांना योग्य प्रतिनिधीत्व मिळण्याचा विश्वास आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाचा जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, आमदार आणि मंत्री म्हणून काम केले आहे. आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल असा विश्वास आहे.

– ईश्वर खंड्रे, माजी मंत्री, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष

 

प्रदेशाध्यक्षपदासाठी परमेश्वर यांचे नावही चर्चेत!

काँग्रेसमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ यावर चर्चा सुरू आहे. उद्यापर्यंत (रविवार) सर्वकाही निश्चित होईल. माझ्या नावाप्रमाणेच माजी गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांचे नाव केपीसीसी अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. हायकमांड दोन-तीन नावांची चाचपणी करून योग्य व्यक्तीची निवड करेल. उपमुख्यमंत्रिपदाची गरज आहे की नाही, हे अद्याप ठरलेले नाही. अंतिम निर्णय हायकमांड घेईल.

– सतीश जाराकीहोळी, माजी मंत्री,  माजी मंत्री, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष

 

 

 

 

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​