उचगाव-कोनेवाडी संपर्क रस्त्यावरती पुलाला संरक्षक कठडे नसल्याने धोकादायक

विद्यार्थ्यांनाही धोका : तातडीने पुलाच्या दुतर्फा कठडे बांधण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
उचगाव-कोनेवाडी या संपर्क रस्त्यावरती उचगाव हद्दीत नाल्यावरती असलेल्या पुलाला दुतर्फा संरक्षक कठडे नसल्याने सदर पूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून रोज कोनेवाडीमधील माध्यमिक विभागासाठी उचगावला येणाऱ्या विद्यार्थ्यांची सातत्याने ये-जा असते. सदर विद्यार्थी सायकलवरून प्रवास करत असतात. यामुळे हा पूल म्हणजे धोकादायक बनला आहे. यासाठी तातडीने या पुलाच्या दुतर्फा कठडे बांधण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिक व शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
उचगाव ते कोनेवाडी हा दोन ते अडीच किलोमीटर अंतराचा संपर्क रस्ता आहे. कोनेवाडी गावाला जायचे असेल किंवा गावातून उचगाव भागात यायचे असेल तर बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरून व तुरमुरी गावाहून कोनेवाडी गावाला किंवा उचगाव परिसरात ये-जा करावी लागते. उचगाव-कोनेवाडी संपर्क रस्ता अडीच किलोमीटर अंतराचा असल्याने तसेच बेळगाव-वेंगुर्ले मार्ग अतिशय रहदारीचा रस्ता असल्याने या संपर्क मार्गावरूनच अनेक नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची रोज ये-जा सुरू असते. मात्र सदर पुलाच्या दुतर्फा कठडेच नसल्याने हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे.
धोकादायक वळण
पुलाच्या प्रारंभीच वळण असल्याने याचा अंदाज बैलगाडी तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांना येत नसल्याने अकस्मात या पुरातून नाल्यात पडून मोठी घटनाही घडू शकते. अशा घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत. यासाठी तातडीने या पुलाच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधून शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांना होणारा धोका टाळावा, अशी मागणी होत आहे.
Source link



