Uncategorized

आंबा-फणसाचे उलगडले मनोहारी चित्र

रंगभूमी ग्रुपतर्फे आंबा महोत्सव : चैत्रातल्या पर्ण-फळशोभेचे वर्णन आंबा-फणसाशिवाय अपूर्णच

बेळगाव : वसंताची चाहूल लागते आणि निसर्गाचे रूपच पालटते. फुलांतून, फळांतून रस वाहू लागतो. सारी सजीव सृष्टी बहरून जाते. चैत्रातल्या पालवीचे मनोहारी रूप खुलू लागते. मात्र, चैत्रातल्या पर्ण शोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंबा-फणसाशिवाय पूर्ण होत नाही. आंबा महोत्सवाच्या निमित्ताने आंबा फणसांचे अत्यंत रसाळ असे मनोहारी चित्र रंगभूमी ग्रुपच्या मेधा मराठे आणि त्यांच्या सहकारी अर्चना ताम्हणकर व प्राजक्ता बेडेकर यांनी उलगडले.

‘कुणी माखले चंदन… हिना कोठून दरवळे

आला वसंत वसंत… पोत कोवळी उमले’

कैऱ्यांचे लांबलचक हिरवे गोळे, कैऱ्या जून होतानाच पाने गळत असतात. पण आंब्याचे झाड रुक्ष असे दिसतच नाही. चैत्रामध्ये या झाडाला पालवीचे घोस लागतात. तर माघ महिन्यामध्ये मोहोराचे झुपके सुगंध दरवळू लागतात. फणसाला फुले नाहीत, परंतु पौष-माघमध्ये त्याला हिरवे कोके येतात. एकेक कोका दुभंगतो आणि आतला हिरवा फणस दिसू लागतो. काटे वाढतात आणि फणस तयार होऊ लागतो. असे हे आंबा, फणस. आंबा म्हणजे ऋग्वेदातील आमवृक्ष, म्हणजेच इच्छापूर्ती करणारा कल्पवृक्ष. आंबा म्हटले की दळदार, रसाळ, केसरी, पिवळा, दाट रसाची सुगंधी चव जीभेवर रेंगाळते. भगवान बुद्ध आंब्याच्या झाडाखालीच विश्रांती घेत.

याच्या आवडीपोटी अलेक्झांडरने तो ग्रीसला नेला. सम्राट अशोक आणि मौर्य राजांनी आंब्याच्या बागा उठविल्या. एकेकाळी राजदरबाराची शान म्हणून पाहुण्यांना आंबे खिलवत असत. बाबरने आंबा सर्वश्रेष्ठ फळ म्हणून जाहीर केले. 1498 मध्ये पोर्तुगीज भारतात आल्यावर त्यांनी आंब्याचा व्यापारच सुरू केला. मल्याळी भाषेतील मंगा इंग्रजीत मँगो झाला. भारतात आंब्याच्या पाचशेहून अधिक जाती आहेत. पण विशेष आंबा म्हणजे कोकणचा राजा हापूस, अशी माहिती मेधा मराठे यांनी अभिवाचनातून दिली.

याला अनुरुप असे ‘माझा गाव’ ही कोकणचे वर्णन करणारी आणि कोकणामधीलच एक कविता अर्चना ताम्हणकर यांनी सादर केली. तर आंबा पुराण कथन करताना प्राजक्ता यांनी आंब्याच्या विविध चवींचे वर्णन केले. निसर्गाची ही भेट, मनाला ऊर्जा देणारा, फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा, बालपणी गोड आनंद देणारा, स्वयंपाकातही रंग भरणारा, आनंदाने घराघरात येणारा तो आंबाच, असे आंब्याचे वर्णन त्यांनी काव्यात्मकरीत्या केले. तसेच आंबा विरुद्ध कैरी ही कवितासुद्धा सादर केली. या तिघांचाही सत्कार प्रा. एस. वाय. प्रभू, पंढरी परब व राजू नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक करून त्यांचा परिचय मनीषा सुभेदार यांनी करून दिला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​