रोम टेनिस स्पर्धेत सिनर विजेता

► वृत्तसंस्था, रोम
2026 च्या रोम मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनरने पुरूष एकेरीचे जेतेपद मिळविताना कास्पर रुडचा सरळ सेट्समध्ये पराभव केला. तब्बल 50 वर्षांनंतर रोम मास्टर्स स्पर्धा जिंकणारा सिनर हा इटलीचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. त्याचप्रमाणे सिनरने आणखी एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. वर्षभरातील 9 मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धा सिनरने जिंकली असून त्याने यापूर्वी असा विक्रम करणाऱ्या सर्बियाच्या जोकोविचशी बरोबरी साधली आहे.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात टॉपसिडेड आणि 24 वर्षीय जेनिक सिनरने कास्पर रुडचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. 1976 साली इटलीच्या अॅड्रीयानो पॅनेटाने रोम मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तब्बल 50 वर्षानंतर ही स्पर्धा जिंकण्याची संधी इटलीच्या सिनरला लाभली. 2026 च्या टेनिस हंगामात सिनरच्या कामगिरीत सातत्य दिसत असून त्याने अलिकडच्या कालावधीत सलग सहावी मास्टर्स 1000 दर्जाची स्पर्धा जिंकली आहे. त्याचप्रमाणे विविध स्पर्धांमध्ये त्याने सलग 34 सामन्यांत आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा पराक्रम केला आहे.
या स्पर्धेत इटलीच्या सिमोनी बोलेली आणि अँड्रीया व्हेव्हासोरी यांनी पुरूष दुहेरीचे जेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात मार्सेल ग्रेनोलर्स आणि झेबालोस यांचा 7-6 (8-6), 6-7 (3-7), 10-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. रोममध्ये 1960 नंतर या स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद मिळविणारी बोलेली आणि व्हेव्हासोरी ही इटलीची पहिली जोडी ठरली आहे.
Source link



