Uncategorized

Ratnagiri News: मुंबई-गोवा महामार्गावर उधळेनजीक कारची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक

अपघातात नाशिकची महिला आणि संगमेश्वरचा ट्रक चालक जखमी

खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उधळे गावानजीक गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एक महिला जखमी झाली, तर अपघातानंतर झालेल्या वादातून कारचालकाने केलेल्या मारहाणीत ट्रक चालकही गंभीर जखमी झाला आहे.

कारची ट्रकला पाठीमागून धडक

मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश गुरव (वय ३६, रा. संगमेश्वर) हे आपल्या ताब्यातील सीएनजी वाहतूक करणारा ट्रक घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. याच वेळी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले कारचालक आपल्या कुटुंबासह नाशिकच्या दिशेने परतत होते. उधळेनजीक आले असता कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यांच्या कारने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून, कारमधील पूजा सुमित गांगुर्डे (वय २३, रा. नाशिक-सिन्नर) ही महिला जखमी झाली.

अपघातानंतर कारचालकाचा राडा; ट्रक चालकाला मारहाण

अपघात झाल्यानंतर कारचालक आणि ट्रक चालक यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. कारचालकाने राग अनावर झाल्याने ट्रक चालक शैलेश गुरव यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गुरव हे देखील जखमी झाले. या अपघातामुळे आणि महामार्गावरील राड्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती.

सामाजिक कार्यकर्त्यांची धाव, जखमींवर उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी रातोरात घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने दोन्ही जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​