Uncategorized

न्हावेलीत बिबट्याची दहशत ; गोठ्यातील वासरु केले फस्त

न्हावेली /वार्ताहर

सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली टेंबवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, १३ मे रोजी मध्यरात्री घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण पंचक्रोशी हादरून गेली आहे. येथील शेतकरी बालू नाईक यांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने नुकत्याच जन्मलेल्या वासरावर हल्ला चढवत ते ओढून नेले. एवढ्यावरच न थांबता, गाईलाही गंभीर जखमी केले.या घटनेनंतर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,रात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट गोठ्यात घुसत अचानक झालेल्या हल्ल्याने गोठ्यातील जनावरे घाबरून ओरडू लागली. आवाज ऐकून घरातील सदस्य बाहेर धावले असता रक्ताच्या थारोळ्यात जखमी गाय आणि बेपत्ता झालेले वासरू पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने या हल्ल्याची खात्री झाली.गेल्या काही दिवसांपासून न्हावेली, टेंबवाडी तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अनेकांनी रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले होते. मात्र वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता थेट गोठ्यात घुसून हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले, शेतकरी व रात्रीच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक भयभीत झाले आहेत. संध्याकाळ होताच गावात शुकशुकाट पसरत असून, अनेकांनी रात्री बाहेर पडणेच टाळले आहे. ग्रामीण भागातील जनावरे आता बिबट्याच्या दहशतीखाली आली असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या नितेशा नाईक यांनी वनविभागावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी जोरदार मागणी केली आहे. “वनविभागाने एखादी जीवितहानी झाल्यानंतर जागे होण्यापेक्षा आताच कठोर पावले उचलावीत,” असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थांकडून वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येत आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​