Uncategorized

उर्विलच्या वादळात लखनौचा उडाला धुव्वा

चेन्नईचा 5 गड्यांनीविजयी, प्लेऑफच्या आशा कायम, 3 बळी टिपणारा ओव्हरटन सामनावीर, जोश इंग्लिसच  अर्धशतक वाया

वृत्तसंस्था / चेन्नई

सामनावीर जेमी ओव्हरटनचा भेदक मारा आणि उर्विल पटेलची तडाखेबंद फटकेबाजी यांच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने रविवारी झालेल्या आयपीएलमधील सामान्यात लखनौ सुपर जायंट्सवर पाच गड्यांनी विजय मिळविला. या विजयासह एकूण 12 गुण घेत चेन्नईने गुणतक्त्यात पाचवे स्थान मिळवित प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

चेन्नईकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर जोश इंग्लिसने 33 चेंडूत 85 धावांची  सनसनाटी खेळी केली. पण चेन्नईच्या गोलंदाजांनी नियंत्रण मिळविल्यावर लखनौने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 203 धावांपर्यंतच मजल मारता आली. लखनौचा हा 11 सामन्यांतील आठवा पराभव होता, त्यांच्या प्लेऑफच्या आशा आता पूर्णपणे संपुष्टात आल्या आहेत. लखनौने जोरदार सुरुवात केली होती. पण चेन्नईचे गोलंदाज जेमी ओव्हरटनने भेदक मारा करीत चेन्नईला बऱ्यापैकी रोखले. ओव्हरटनने इंग्लिस व रिषभ पंत यांना तीन चेंडूंच्या फरकाने बाद केले. मात्र शाहबाद अहमदने 25 चेंडूत नाबाद 43 धावा फटकावत संघाला दोनशेची मजल मारून दिली.

आव्हानाचा पाठलाग करताना उर्विल पटेलने तुफानी फटकेबाजी करीत केवळ 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याची फटकेबाजी व शिवम दुबे (7 चेंडूत नाबाद 15) व प्रशांत वीर (12 चेंडूत नाबाद 17) यांच्या समयोचित फलंदाजीने चेन्नईने चार चेंडू बाकी असताना 204 धावांचे उद्दिष्ट गाठले. सलग दोन षटकार ठोकत दुबेने विजय साकार केला. उर्विल पटेलने 23 चेंडूत 65 धावा झोडपताना 8 षटकार व 2 चौकार मारले. 13 चेंडूत अर्धशतक नोंदवत त्याने यशस्वी जैस्वालच्या वेगवान अर्धशतकाशी बरोबरी केली. सुरुवातीला संजू सॅमसनने 14 चेंडूत जलद 28 धावा फटकावत चेन्नईला वेग मिळवून दिला होता. उर्विल खेळत असताना रुतुराज गायकवाडने दुय्यम भूमिका घेत त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक दिला. तरीही गायकवाडने 28 चेंडूत 42 धावा फटकावल्या. दहाव्या षटकात उर्विल बाद झाला तेव्हा चेन्नईने 126 धावांची मजल मारत विजयाच्या दिशेने आगेकूच केली होती.

तत्पूर्वी, जोश इंग्लिसने जोरदार फटकेबाजी करीत चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. पाच षटकांत त्याने लखनौला बिनबाद 77 धावांपर्यंत पोहोचवले हेते. त्याने केवळ 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मिचेल मार्श मात्र केवळ 10 धावा जमवित त्याला पूरक साथ देण्याचे काम केले. इंग्लिसने अकील हुसेनच्या एका षटकात 16 धावा फटकावल्या. नंतर मुकेश चौधरी व अन्शुल कंबोज यांनाही फटकावले. पॉवरप्लेच्या अखेरीस 1 बाद 91 धावा जमविल्या होत्या. नंतर शाहबाज अहमद वगळता इतरांना फारसे योगदान देता आले नाही.

संक्षिप्त धावफलक : लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 8 बाद 203 : जोश इंग्लिस 33 चेंडूत 10 चौकार, 6 षटकारांसह 85, मार्श 10, पंत 12 चेंडूत 15, अक्षत रघुवंशी 12 चेंडूत 18, शाहबाज अहदम 25 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 43, हिम्मत सिंग 12 चेंडूत 17, अवांतर 8. जेमी ओव्हरटन 3-36, कंबोज 2-47, नूर अहमद 1-24.

चेन्नई सुपर किंग्स 19.2 षटकांत 5 बाद 208 : सॅमसन 14 चेंडूत 28, गायकवाड 28 चेंडूत 42, उर्विल पटेल 23 चेंडूत 2 चौकार, 8 षटकारांसह 65, कार्तिक शर्मा 20, ब्रेव्हिस 10, दुबे 7 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 15, प्रशांत वीर 12 चेंडूत 2 षटकारांहस नाबाद 17, अवांतर 11. दिग्वेश राठी 2-45, शाहबाज अहमद 2-30, आवेश खान 1-44.

-उर्विल पटेलची वेगवान आयपीएल अर्धशतक नोंदवण्यात जैस्वालशी बरोबरी

-उर्विलने लखनौच्या तर जोश इंग्लिसने चेन्नईच्या गोलंदाजांची केली धुलाई

-उर्विलने वडिलांना अर्धशतकी खेळी समर्पित केली.

-दुबे व प्रशांत वीर यांनी अखेरच्या टप्प्यात चेन्नईचा विजय साकार केला.

 वादळी खेळीनंतर उर्विलचे वडिलांना अभिवादन

उर्विलने आवेश खानला सलग तीन षटकार ठोकल्यानंतर दिग्वेश राठीला तीन षटकार व एक चौकार मारत 25 धावा वसूल केल्या. अनुभवी शमीलाही त्याने मिडविकेटला उत्तुंग षटकार मारला. एकेरी धाव घेत त्याने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने आकाशाकडे पाहत आपल्या वडिलांना अभिवादन केले. त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली, त्यावर ‘हे अर्धशतक तुमच्यासाठी पापा’, असे लिहिले होते. विक्रमाशी बरोबरी करणारे अर्धशतक नोंदवल्यावर त्याने वडील मुकेश पटेल यांना अशा प्रकारे मानवंदना दिली. त्याला व्यावसायिक क्रिकेटपटू बनविण्यासाठी मुकेश पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​