एपीएमसी भाजीमार्केट व्यापार्यांचे ठिय्या – Tarun Bharat

खासगी संडे मार्केटचे एपीएमसीमध्ये स्थलांतर करा अन्यथा, तीव्र आंदोलन : सचिव विश्वनाथ रेड्डी यांना निवेदन
एपीएमसी मार्केट यार्ड आवारातील तात्पुरते असणारे खासगी संडे मार्केटचे स्थलांतर एपीएमसी भाजीमार्केटमध्ये त्वरित करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत एपीएमसी भाजीमार्केट व्यापाऱ्यांनी शनिवारी एपीएमसी कार्यालयासमोर प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करीत ठिय्या आंदोलन करून एपीएमसी सचिव विश्वनाथ रे•ाr यांना निवेदन देण्यात आले.
त. भा. वार्ताहर
अगसगे : गेल्या आठ महिन्यापूर्वी गांधीनगर येथील खासगी जय किसान भाजीमार्केटचा परवाना रद्द झाला. त्या व्यापाऱ्यांना तात्पुरते म्हणून एपीएमसी मार्केट यार्ड आवारातील एपीएमसी कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या संडे मार्केटची जागा प्रशासनाने जय किसान भाजीमार्केटच्या व्यापाऱ्यांना तात्पुरती दिली आहे. थोड्या दिवसांनी त्यांनाही एपीएमसी भाजीमार्केटमधील दुकाने देऊन एकच ठिकाणी व्यापार करण्यास परवानगी देऊ, असे आश्वासन यावेळी प्रशासनाने दिले होते. मात्र नऊ महिने झाले तरी प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे याचा परिणाम शेतकरी व खरेदीदारांवर होत आहे. कारण एपीएमसी आवारात दोन भाजीमार्केट झाल्यामुळे व्यवहाराचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. एका भाजीमार्केटमध्ये एक दर तर दुसऱ्या भाजीमार्केटमध्ये वेगळाच दर होत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडला आहे.
प्रशासनाचे साफ दुर्लक्ष
खासगी जय किसानच्या व्यापाऱ्यांना तात्पुरते म्हणून संडे मार्केट उपलब्ध करून दिले आहे. त्यावर एक दोन महिन्यात तोडगा काढून त्या व्यापाऱ्यांनाही एपीएमसीच्या भाजीमार्केटमधील दुकानांमध्ये दुकाने उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र अद्याप आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी शनिवारी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करीत संडे मार्केटचे स्थलांतर एपीएमसी भाजीमार्केटमध्ये त्वरित करावे अशी मागणी केली
कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक
एपीएमसी आवारातील दुकाने घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी 70 ते 80 लाख रुपये कर्ज घेतले आहे. या दुकानांचा कर, लाईट बिल व्यापार बंद असताना देखील भरले आहे. तसेच व्यापारासाठी लाखो रुपये धंद्यामध्ये गुंतवले आहेत. मात्र दोन-तीन वर्षे व्यापारच ठप्प झाल्याने अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित व्यापाऱ्यांनी केला.
भाजीमार्केट दोन झाल्याने व्यापारी-शेतकऱ्यांना नाहक त्रास
न्यायालयीन लढा लढून गैरमार्गाने मिळवलेले जय किसान भाजी मार्केटचा परवाना न्यायालयाने रद्द करून एपीएमसी भाजी मार्केटमध्ये पूर्वीप्रमाणेच एकाच ठिकाणी बाजार भरवावा असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, सध्या एपीएमसी आवारातच दोन भाजी मार्केट झाल्याने शेतकऱ्यांसह खरेदीदारांना देखील नाहक त्रास सोसावा लागत आहे.
सुसज्ज भाजीमार्केट उभारून फायदा काय?
एपीएमसी मार्केट यार्डच्या आवारात सुमारे 14 एकर जागेमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून प्रशासनाने सुसज्ज असे भाजीमार्केट उभारले आहे. मात्र केवळ दोनच वर्ष या ठिकाणी व्यापार चालला. त्यानंतर खासगी जय किसान भाजीमार्केट सुरू झाल्याने येथील व्यापार ठप्प झाला.
प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित संडे मार्केटचे स्थलांतर एपीएमसी भाजीमार्केटमध्ये करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास याला जिल्हा प्रशासनच जबाबदार राहणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
80 दुकाने उपलब्ध
संडे मार्केटच्या व्यापाऱ्यांना देण्यासाठी एपीएमसी भाजीमार्केटमध्ये सुमारे 80 गाळे रिकामी आहेत. त्यांनी या ठिकाणी यावे व एकाच ठिकाणी व्यापार करावा, असे व्यापारी सतीश पाटील म्हणाले.
प्रशासनाच्या विरोधात व्यापाऱ्यांची जोरदार निदर्शने
प्रशासनाने आश्वासनांची पूर्तता न केल्याने छेडले आंदोलन
एकाच ठिकाणी व्यापार केल्यास सर्वांच्या दृष्टीने फायद्याचे
Source link


