Sports News: शाब्बास निवेदिता!, शिरोळच्या सुकन्येची ‘आईस हॉकी’च्या महाराष्ट्र संघात निवड

निवेदिताने थायलंड व मलेशिया येथेही भारतासाठी पदकांची कमाई केलीये
शिरोळ : येथील आईस हॉकी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी 7 मे रोजी पार पडलेल्या आईस हॉ की फेडरेशन ऑफ महाराष्ट्र राज्य संघ निवड चाचणीत शिरोळची सुकन्या निवेदिता शिंदे हिची आईस हॉकीच्या महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
निवेदिता शिंदे हि आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू असून, नगरसेवक अमरसिंह शिंदे यांची कन्या व माजी उपनगराध्यक्ष कमलाताई शिंदे यांची नात आहे. कु. निवेदिता हिने यापूर्वी थायलंड व मलेशिया येथे भारतासाठी पदकांची कमाई करून देशाचे नाव उज्ज्वल केलेले आहे.
निवेदिता शिंदे ही जयसिंगपूरच्या तेज रोलर स्केटिंग अकॅडमीची खेळाडू असून, तेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या सहापैकी सहा विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे शिरोळ तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवड चाचणीमध्ये राज्यभरातून तब्बल अडीचशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये तेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या सहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांना बर्फावरील खेळाचा कोणताही प्रत्यक्ष अनुभव नसताना केवळ इनलाइन स्केटिंगच्या सरावाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
जयसिंगपूरसारख्या छोट्या शहरातून आईस हॉकीसारख्या खेळात राज्य संघासाठी निवड होणारे हे पहिलेच खेळाडू ठरले आहेत. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये शिरोळ येथील सुकन्या निवेदिता शिंदे हिच्यासह विराज राजेश कलनावर (अकीवाट), पियुष परमेश्वर रणशूर(जयसिंगपूर), प्रणील संजू विवी (जयसिंगपूर),रवीतेज प्रबोध वैद्य(जयसिंगपूर), कार्तिक आकाश लोंढे(जयसिंगपूर) या अकॅडमीच्या खेळाडूंचा देखील समावेश आहे.
तेजस पाटील यांचे मार्गदर्शन
सर्व खेळाडूंची जून महिन्यात डेहराडून येथे होणाऱ्या राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाकडून निवड करण्यात आली आहे. या यशासाठी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक तेजस पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल खेळाडूंवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Source link



