इराणचा नवा प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला

होर्मुझ संकट आणखी तीव्र होण्याचे संकेत : अमेरिका-युरोप संबंधांमध्येही वाढता दुरावा
वृत्तसंस्था/ तेहरान
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला असून, युद्धाचा धोका तीव्र झाला आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीन शांतता प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला आहे. सुमारे 40 दिवसांच्या भीषण संघर्षानंतर अमेरिकेसोबतचा संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने इराणने हा प्रस्ताव सादर केला होता. तथापि, ट्रम्प यांनी या प्रस्तावातील मागण्या स्वीकारणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, इराणच्या मुद्यावरून अमेरिका आणि युरोप यांच्यातील मतभेदही समोर आले आहेत. फ्रेडरिक मेर्झ यांच्यासोबतच्या वादानंतर, ट्रम्प प्रशासनाने जर्मनीमधून 5,000 अमेरिकी सैनिक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेंटागॉनने याला दुजोरा दिला आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढत आहे. दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष हेण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिका कोणत्याही कराराबाबत गंभीर नसल्याचे इराणने म्हटले आहे. इराणने एक नवा प्रस्ताव पाकिस्तानमार्फत ट्रम्प प्रशासनाकडे पाठवला आहे. मात्र, यातील अटी कठोर असल्याने त्या स्वीकारणे शक्य नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणला अण्वस्त्रs मिळवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, याचाही ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. दुसरीकडे, इराण राजनैतिक वाटाघाटींसाठी तयार असतानाच बचावात्मक भूमिका घेण्यासही सक्षम आहे. जर अमेरिकेने आपली ‘आक्रमक धोरणे आणि चिथावणीखोर कारवाया’ थांबवल्या, तर इराण राजनैतिक तोडगा काढण्यास तयार असल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे.
45 जहाजे परत पाठवल्याचा दावा
होर्मुझ प्रदेशातील वाढत्या तणावाचा जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. आतापर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 45 जहाजे परत पाठवण्यात आली आहेत, असा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने केला आहे. ही घडामोड जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल पुरवठा मार्गांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण सागरी मार्गावरील सततच्या अस्थिरतेचे द्योतक आहे.
शिपिंग कंपन्यांना अमेरिकेचा इशारा
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गासाठी इराणला कोणत्याही प्रकारचे पैसे देणाऱ्या शिपिंग कंपन्यांना इशारा दिला आहे. पेमेंटचे नाव काहीही असले तरी, अशा प्रकरणांमध्ये कठोर निर्बंध लागू होऊ शकतात, असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेच्या मूर्खपणाला प्रत्युत्तर देण्यास सज्ज डोनाल्ड ट्रम्प यांना इराणचे प्रत्युत्तर
इराणच्या लष्कराने अमेरिका आणि इस्रायलसोबत पुन्हा युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इराणचे सशस्त्र दल पूर्णपणे सतर्क असून कोणत्याही परिस्थितीशी तोंड देऊ शकते. अमेरिकेच्या कोणत्याही नवीन कृतीला किंवा मूर्खपणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे सैन्य पूर्णपणे तयार असल्याचा इशारा इराणच्या लष्करी मुख्यालयाचे उपप्रमुख मोहम्मद जाफर असदी यांनी दिला. अमेरिका कोणत्याही कराराशी किंवा संधीशी एकनिष्ठ नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या नवीन कराराचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांची अलीकडील वक्तव्ये आणि कृतींमुळे राजनैतिक करारांबाबतच्या त्यांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. अमेरिकन अधिकाऱ्यांची बहुतेक वक्तव्ये माध्यमांना डोळ्यासमोर ठेवून केली जातात. त्याचा उद्देश तेलाच्या किमती कमी होण्यापासून रोखणे आणि त्यांनी निर्माण केलेल्या परिस्थितीतून स्वत:ची सुटका करून घेणे हा असतो, असेही असदी म्हणाले.
Source link



