Uncategorized

द्वितीय टप्प्यात काही प्रमाणात हिंसाचार

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण, निकालासाठी 4 मेची प्रतीक्षा

हिंसाचाराच्या काही घटना

  • भवानीपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्ष-तृणमूल काँग्रेस झटापट
  • पूर्व वर्धमान जिल्ह्यात गावठी बाँबनी भरलेली पिशवी त्वरित हस्तगत
  • उत्तर 24 परगाणा जिल्ह्यात मतदान केंद्रावर एका वृद्धाचा झाला मृत्यू

वृत्तसंस्था/कोलकाता

निवडणूक हिंसाचारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 142 मतदारसंघ असलेल्या द्वितीय आणि अंतिम मतदान टप्प्यालाही काही प्रमाणात हिंसाचाराचे गालबोट लागल्याचे दिसून आले आहे. तथापि, मागच्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत या संपूर्ण निवडणुकीत हिंसाचाराचे प्रमाण अत्यल्प राहिले. केंद्रीय निवडणूक आयोगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवल्याने मतदान मोठ्या प्रमाणात शांततेत पार पडले.

भवानीपूर मतदारसंघातील संघर्ष सर्वाधिक आकर्षणाचा विषय ठरला आहे. या मतदारसंघात शुभेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी एकमेकांसमोर आहेत. बुधवारी दुपारी शुभेंदू अधिकारी या मतदारसंघातील एका मतदान केंद्राला भेट देण्यासाठी गेले असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण काही काळ तंग बनले होते. नंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी दंगलखोरांवर लाठीमार करुन त्यांनी पांगापांग केली. त्यामुळे काही काळातच परिस्थिती नियंत्रणात आली. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचे आरोप केले आहेत. तसेच मतदानात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोत एकमेकांवर करण्यात आले.

कमळाच्या चिन्हावर टेप

फलाटा मतदारसंघात काही मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांवरच्या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर टेप चिकटविलेली आढळून आली. ही बाब त्वरित केंद्रीय निवडणूक आयोगाला कळविण्यात आली. आयोगाने या संबंधी सविस्तर अहवाल मागविला असून या घटनेत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे स्पष्ट केले. नंतर मतदान सुरळीत करण्यात आले. तथापि, टेप प्रकरणात तथ्य असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात येणार असल्याचा संकेत आयोगाने दिला आहे.

18 स्थानी मारामारीच्या घटना

द्वितीय टप्प्यातील मतदान काळात एकंदर 18 स्थानी भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीचे प्रसंग घडले. मात्र, केंद्रीय पोलीस दलांनी त्वरित कारवाई केल्याने हे सर्व प्रसंग थोडक्यातच आटोपले. दक्षतेचा उपाय म्हणून मंगळवारपासून समाजकंटकांनी अटक करण्याचे सत्र केंद्रीय पोलीसांनी चालविले होते. एकंदर 3 हजारांहून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आल्याने मतदान पुष्कळच शांततेने पार पडल्याचे दिसले.

एका वृद्धाचा मृत्यू

उत्तर 24 परगाणा जिल्ह्यात एका मतदानकेंद्रावर एका 81 वर्षे वयाच्या वृद्धाचा मृत्यू झाला. हा मृत्यू केंद्रीय पोलिसांनी मारहाण केल्याने झाला, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. मात्र, केंद्रीय दलांच्या अधिकाऱ्यांनी हा आरोप नाकारला आहे. अन्य एका स्थानी पीएसएफ आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीची घटना घडली. पूर्व वर्धमान जिल्ह्यात गावठी बाँबनी भरलेली एक पिशवी केंद्रीय पोलिसांनी वेळीच हस्तगत केल्याने मोठा अनर्थ टळला.

मतदारांना घाबरविण्याचे प्रकार

काही मतदान केंद्रांमध्ये मतदारांना घाबरविण्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. या निवडणुकीचे उत्तरदायित्व सोपविण्यात आलेले उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारी अजय शर्मा यांच्याकडे दोन मतदारांनी  घाबरविण्यात आल्याच्या तक्रारी केल्या. त्यांनी या मतदारांना धीर देऊन त्वरित कारवाईचे आदेश दिले. मात्र, एकंदर मतदान सुरळीत पार पडले. लोकशाही राज्यव्यवस्थेत अशा प्रकारची अत्याचारी सुरक्षा व्यवस्था पाहिली नव्हती, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली. तृणमूल काँग्रेसचा हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेला, असे प्रतिपादन शुभेंदू अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​