नशे विरुद्ध निर्णायक लढा !

ड्रग्ज माफियांचे कर्दनकाळ ‘समिर वानखेडे लाईव्ह-शो’चे कुडाळात 23 रोजी आयोजन
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, दै. तरुण भारत संवाद आणि साई जळवी फिल्म्सचे संयुक्त आयोजन
त. भा. प्रतिनिधी
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडच्या काळात ड्रग्सचे वाढते प्रमाण आणि त्यातून निर्माण होणारी व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे. तरुण पिढीपर्यंत पोहोचलेले हे जाळे किती भयानक स्वरूप धारण करत आहे, याची जाणीव समाजाला करून देणे आणि त्यावर ठोस उपाययोजना शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, साई जळवी फिल्म्स आणि ‘तरुण भारत (संवाद)’ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ एम.आय.डी.सी. येथे एक महत्त्वपूर्ण जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात वरिष्ठ आय.आर.एस. अधिकारी व अतिरिक्त आयुक्त (चेन्नई) समीर वानखेडे यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. “एकच ध्येय ड्रग्समुक्त सिंधुदुर्ग” या संकल्पनेवर आधारित या संवादातून ड्रग्सच्या वाढत्या विळख्याचे भयावह वास्तव, त्यामागील साखळी, तसेच समाजाने आणि विशेषतः तरुणांनी कोणती भूमिका घ्यावी, यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. ड्रग्सविरोधात प्रभावी लढा उभारण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचाही ऊहापोह या संवादातून होणार आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री व दिग्दर्शक क्रांती रेडकर-वानखेडे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, त्या देखील तरुणांशी संवाद साधून नशामुक्त आयुष्याचा संदेश देणार आहेत. कार्यक्रमाचे मुलाखतकार तरुण भारत संवाद सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत असून त्यांच्या प्रश्नांमधून या गंभीर विषयाचे विविध पैलू उलगडले जाणार आहेत. गुरुवारी २३ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत बॅरिस्टर नाथ पै कॉलेज, कुडाळ एम.आय.डी.सी. येथे हा कार्यक्रम होणार आहे. सिंधुदुर्गातील वाढत्या ड्रग्सच्या संकटाची खरी स्थिती, त्यामागचे भयानक वास्तव आणि त्याचे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना तसेच आपल्या प्रत्येकाची जबाबदारी काय आहे, याची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर या ‘थेट संवाद’ कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, साई जळवी फिल्म्स, दैनिक तरुण भारत संवाद, जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स साळगांव व हॉटेल कोकण स्पाईस या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
Source link



