Murgud News | मुरगुड-कापशी रोडवर मधमाशांचा थरार! करवंदाच्या जाळीतून उठलेल्या थव्याचा वाहनधारकांवर हल्ला

मुरगुड-कापशी रोडवर मधमाशांचा हल्ला
मुरगुड– कापशी रोडवरील दौलतवाडी स्मशान भूमीजवळ करवंदाच्या जाळीतून उठलेल्या मधमाशांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांवर हल्ला केला. यामध्ये दोन दाम्पत्यांसह सातजण जखमी झाले. जखमींवर मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत माहिती अशी, करवंदे काढण्यास गेलेल्या अज्ञाताने करवंदाची जाळी हलवल्यानंतर उठलेल्या मधमाशांनी दौलतवाडी स्मशानभूमी जवळील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये मुरगूडहून क्लास झाल्यानंतर दुचाकीने गावी चाललेल्या हळदवडेच्या प्रियांका प्रवीण हिरुगडे (वय ३५) तसेच वंशिका प्रवीण हिरुगडे (वय १०)आणि अर्णव परशराम इंदलकर (वय ९) (रा. हळदवडे ता. कागल) हे मायलेकीसह तिघे जण गंभीररित्या जखमी झाले. याचवेळी कापशीहून राधानगरी गावी वाहनाने चाललेल्या नितीन सुरेश कांबळे (वय ३८) निता नितीन कांबळे (वय ३५) दोघेही रा. राधानगरी यांनादेखील मधमाशांनी लक्ष्य केले. तसेच बिद्रीवरून दुंडगे ता. गडहिंग्लजकडे जाणारे दुचाकीरवार दांपत्य गणपती रामचंद्र सुतार (वय ५१ ) आणि सौ. रोहिणी गणपती सुतार ४५ (दोघेही दुंडगे ता. गडहिंग्लज यांच्यावरही मधमाशांनी हल्ला केला.
सर्व जखमींना तातडीने मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉ. भूमरे यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत रुग्णांवर उपचार चालू होते.
Source link


