Uncategorized

रणकुंडये-चोर्ला रस्ता डांबरीकरण अंतिम टप्प्यात

पावसाळ्यापूर्वी गटारींची स्वच्छता-रस्त्याच्या बाजूने मातीचा भराव टाकणे अत्यंत गरजेचे

वार्ताहर/कणकुंबी

बेळगाव, चोर्ला, गोवा रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, बैलूर क्रॉस ते रणकुंडयेपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाला गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी सुरुवात केले आहे. गेल्या एप्रिल-मे महिन्यात चोर्ला ते बैलूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे पहिल्या टप्प्यात डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र वेळेअभावी बैलूर क्रॉस ते रणकुंडयेपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट राहिले होते. ते काम आता सुरू झाले आहे. चोर्ला ते बैलूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्यापैकी कालमणी ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याची काही ठिकाणी अवघ्या दोन-तीन महिन्यांतच चाळण झाली होती. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी आणि वाहनधारकांचे भरपूर हाल झाले. त्यामुळे चोर्ला रस्त्याच्या पॅचवर्कचे काम गेल्या जानेवारीपासून सुरू केले असून सदर काम अतिशय मंदगतीने सुरू आहे.

जांबोटी बसस्थानक परिसरातील काम वर्षभरापासून अर्धवट

जांबोटी बसस्थानक परिसरातील दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम वर्षाभरापासून अर्धवट आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटारींचे काम आणि दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकण्याचे कामही मागील उन्हाळ्यापासून रेंगाळलेले आहे. कंत्राटदाराच्या या वेळकाढूपणामुळे जांबोटी, कणकुंबी भागातील नागरिक वैतागले आहेत. सध्या जांबोटी बसस्टँडवरील गटारांचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.

कुसमळी मलप्रभा नदीवरील पुलावरुन वाहतूक सुरू

पाच-सहा महिन्यांनंतर नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बेळगाव-चोर्ला-गोवा या रस्त्यांपैकी चोर्ला या 43 कि. मी. पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 58.90 कोटी रुपये मंजूर केले होते. यापैकी केवळ 35.30 कोटी रुपयांचे टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्ताकामाला गेल्या जानेवारीत सुरुवात केली होती. एप्रिल, मे महिन्यात करण्यात आलेले दुसऱ्या थरातील आमटे, चिखले, पारवाड दरम्यानच्या रस्त्यावरील डांबर अवघ्या दीड ते दोन महिन्यांत उखडून गेल्याने कामाबाबत साशंकता निर्माण झाली होती. रस्त्याच्या दुतर्फाची माती पावसामुळे वाहून गेल्याने काही ठिकाणी मोठमोठ्या चरी पडल्या आहेत. पाच-सहा वर्षात रस्त्याची साधी दुरुस्ती देखील करण्यात आली नव्हती. मागीलवर्षी  डांबरीकरणासाठी 2023 ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार चोर्ला ते बैलूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले होते. मात्र साईडपट्ट्या भरल्या नाहीत. काही ठिकाणी अर्धा ते दीड फुटापर्यंत  पडलेल्या चरी तशाच असून रस्त्याच्या बाजूला वाहन घेणे धोकादायक बनले आहे.  परिणामी वाहने घसरून अपघात होत आहेत.

गटारी दुरुस्तींची आवश्यकता

परंतु चोर्ला रस्त्याच्या बाबतीत गेल्या पाच-सहा वर्षांपासून गटारींची साफसफाई केली नसल्याने गटारीत पालापाचोळा व दगड माती अडकून गटारी भरून गेल्या आहेत. पावसाळ्dयापूर्वीच साईडपट्ट्या व गटारींची कामे हाती घेऊन वाहनधारकांना दिलासा देणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही.

बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्याच्या कामात वनखात्याचा नेहमीच अडथळा

बेळगाव-चोर्ला-गोवा रस्ता हा दोन्ही राज्यांसाठी अत्यंत जवळचा असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी तसेच अवजड वाहनांची वाहतूक होत असते. गेल्या काही वर्षापासून वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे या रस्त्याच्या विकासाचे काम वेळोवेळी अडवण्यात आले आहे. या रस्त्याचे महत्त्व ओळखून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी 279 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामाला चालना दिली होती. परंतु पर्यावरण व वनखात्याने यामध्ये आडकाठी घालून सदर काम बंद पाडले. खड्ड्यांमुळे रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला होता. त्यामुळे ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन चोर्ला रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार नितीन गडकरी यांनी पुन्हा या रस्त्यासाठी 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात कामाचा शुभारंभही झाला. पण वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा आडकाठी घालून रस्त्याचे काम बंद पाडले होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​