रवींना स्मऊन रितेशना विजयी करा!

फोंड्यातील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : गोव्यात 2027 मध्येही डबल इंजिन सरकार येणार
फोंडा : गोव्यातील बहुजनांचे लोकनेते, कुळ मुंडकारांचे कैवारी आणि फोंड्याच्या विकासाचे शिल्पकार माजी आमदार रवी नाईक यांच्या अकाली जाण्याने ही निवडणूक घ्यावी लागत आहे. सामूहिक भावनेची किनार असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. गोव्यातील विरोधी पक्षांना राजकीय संस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करण्याची योग्य संधी होती. पण त्यांनी ती गमावली. आता मतदारांनीच रवी नाईक यांच्याप्रती प्रेम आणि आदर दाखवून कर्तव्य भावनेने मतदान करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फोंडा मतदारसंघात 9 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार रितेश रवी नाईक यांच्या प्रचारसभेत फडणवीस बोलत होते.
काल सोमवारी सायंकाळी येथील जुन्या बसस्थानकावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधीत करताना फोंड्याची ही पोटनिवडणूक भाजपा तर जिंकणारच पण येत्या 2027 च्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा भाजपाचे डबल इंजिन सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मगो पक्षाचे नेते व वीजमंत्री सुदिन ढवळीकर, बांधकाममंत्री दिगंबर कामत, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यासह भाजपाचे अन्य नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
भाजपाशिवाय पर्याय नाही
आपल्या अर्ध्या तासांच्या जोशपूर्ण भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याच्या चौफेर विकासासाठी भाजपा सरकारशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. केंद्रातील मोदी सरकार व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने गेल्या चौदा वर्षांत गोव्यात पर्यटन आणि उद्योगवाढीच्या दृष्टीने निर्माण केलेल्या साधनसुविधांमुळे या छोट्या राज्याची अर्थव्यवस्था तीन पटीने वाढली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी शैक्षणिक हब म्हणून गोव्यात निर्माण केलेल्या साधनसुविधांमुळे येथील अर्थकारणाला अजून मजबुती मिळेल. मानवी संसाधनाच्या विकासामुळे व्यापार, उद्योग व रोजगाराला चालना मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
रवींच्या स्वप्नासाठी मतदान करा
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी आधुनिक गोव्याचा पाया घातला. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविणाऱ्या विविध योजना पर्रीकरांनी राबविल्या व त्याला सावंत सरकारने बळ दिले असा उल्लेखही त्यांनी केला. ‘विकसित भारत 2047’ हे मोदी सरकारचे स्वप्न आहे. पण गोव्यात ज्या पद्धतीने विकास सुऊ आहे, ते पाहिल्यास दहा वर्षे आधीच 2037 मध्ये गोवा राज्य हा टप्पा गाठणार आहे. फोंड्याची निवडणूक आठ महिन्यांसाठी होत असली तरी, रवी नाईक यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी रितेश नाईक यांना विजयी करण्याचे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मित्रपक्षाच्या साथीने मोठ्या विजयाची खात्री : दामू नाईक
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, रवी नाईक यांच्यामुळेच फोंडा मतदारसंघात पहिल्यांदा कमळ फुलले. त्यांचे पुत्र रितेश नाईक हे सुसंस्कारीत व तेवढेच कर्तव्यदक्ष जबाबदारीचे भान असलेले तऊण नेते आहेत. भाजपला अशाच आमदाराची गरज आहे. मगो पक्षाची भक्कम साथ व मतदारांच्या विश्वासावर मोठ्या विजयाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
वडिलांच्या विचारांनी फोंड्याचा विकास पुढे नेणार : रितेश नाईक
वडिलांनी दिलेले संस्कार आणि जनसेवेचा विचार आपण पुढे घेऊन जाणार आहे. फोंड्याचे नगराध्यक्ष असताना वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामांचा पाया घातला. येणाऱ्या काळात उर्वरित कामे पुढे नेण्यात येतील, असे सांगून भाजपाच्या सर्व नेत्यांचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर ही निवडणूक निश्चितच जिंकू, असा विश्वास रितेश नाईक यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या उमेदवाराने मगोला दगा दिला : श्रीपाद नाईक
मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, रवी नाईक यांनी शेतकरी, कष्टकरी आणि बहुजनांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आजीवन कार्य केले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली उणीव भऊन काढण्यासाठी रितेश नाईक यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या उमेदवाराने आपल्या स्वार्थासाठी मगो पक्षाला दगा दिल्याची टिकाही त्यांनी केली.
ख्रिस्ती समाजाला मोठा आधार होते : मायकल लोबो
आमदार मायकल लोबो यांनी रवी नाईक हे बहुजनाप्रमाणेच ख्रिस्ती व अन्य जातीच्या सामान्य लोकांना नेहमीच आधार वाटल्याचे सांगितले. आपल्या नेतृत्वाच्या जडणघडणीतही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. सर्वसामान्यांसाठी ते नेहमीच आदर्श होते. त्यासाठी जाती धर्माचे राजकारण बाजूला ठेऊन फोंड्याच्या पात्रांवचे मतदानातून ऋण फेडण्याचे आवाहन त्यांनी केले.
मगो-भाजपा युती कायम राहणार : ढवळीकर
फोंड्याची पोटनिवडणूक ही अपरिहार्यतेतून आली आहे. अन्य पक्षांनी हा विचार करायला हवा होता. रवी नाईक यांच्यानंतर त्यांचे पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी द्यावी आणि बिनविरोध निवडून आणावे ही मगो पक्षाची सुऊवातीपासून भूमिका होती. आता निवडणूक बिनविरोध होत नसली तरी मगो व भाजपाचे सर्व कार्यकर्ते रितेश नाईक यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणतील. फोंड्याच्या या विजयाने येणाऱ्या 2027 च्या विधानसभा निवडणुकीतही युतीधर्म कायम राहणार असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
रवी नाईक यांच्या पुण्याईला मतांचा आशिर्वाद देऊन रितेश नाईक यांना विजयी करा व फोंड्याच्या विकासाला पाठिंबा देण्याचे आवाहन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. मंत्री दिगंबर कामत म्हणाले, फोंड्याचा विकास केवळ रवी नाईक यांच्यामुळेच झाला. यापुढेही तो कायम ठेवण्यासाठी भाजपाचे उमेदवार रितेश नाईक यांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार गोविंद गावडे यांनी भाऊसाहेब बांदोडकरानंतर बहुजनांचे खरे आधारस्तंभ रवी नाईक हेच होते. त्यांचा हा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे नेणे यात घराणेशाहीचा मुद्दा गौण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचार प्रमुख विश्वनाथ दळवी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल देसाई यांनी केले. नगरसेवक आनंद नाईक यांनी आभार मानले. सभेला माजी आमदार अॅङ नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, आमदार उल्हास तुयेकर, संकल्प आमोणकर, दाजी साळकर, नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, कुर्टीचे सरपंच नावेद तहसिलदार यांच्यासह फोंडा पालिकेचे नगरसेवक व कुर्टी पंचायतीचे पंचसदस्य आणि भाजपाचे अन्य नेते उपस्थित होते.
मतदानातून पात्रांवना श्रद्धांजली द्या : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, फोंड्याच्या विकासाचा पाया रवी नाईक यांनी रचला. शिक्षण आणि अन्य क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळातील उर्वरित प्रकल्प येत्या आठ महिन्यात मार्गी लावले जाणार असून इतर मतदारसंघाप्रमाणेच फोंड्याच्या विकासासाठी शंभर कोटींचा निधी दिला जाणार आहे. फोंड्याचे पात्रांव म्हणून सर्वांच्या मनात रवी नाईक यांना प्रेम आणि आदर होता. येत्या 9 रोजी मतदानातून त्यांना श्रद्धांजली देऊन फोंड्याचा विकास पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोंडा तालुक्याला शैक्षणिक हब पुढे नेण्यासाठी आयआयटी गोवा कॅम्पस फर्मागुडीत तसेच पशु वैद्यकीय कॉलेज कुर्टी येथे सुऊ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
Source link



