नंदगडच्या चांभार तलावाचे अस्तित्व धोक्यात

तलावाची दयनीय अवस्था : नागरिक संतप्त : तातडीने स्वच्छता करण्याची गरज
वार्ताहर/हलशी
नंदगड येथील हलशी रस्त्यालगत असलेला चांभार तलाव सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या महत्वाच्या जलस्रोताचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एकेकाळी परिसरातील शेतकरी, जनावरे आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारा हा तलाव आज जल वनस्पती, कचरा आणि घाणीने वेढला गेला आहे. परिणामी तलावाचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या तलावाची स्वच्छता करून खोलबंदी करण्यात यावी, अशी मागणी नंदगड ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. या तलावाची देखभाल लघुपाटबंधारे खात्याकडे आहे.
मात्र लघु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी या तलावाकडे साफ दुर्लक्ष केल्याने तलावाचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नंदगड गावाला लागूनच पाण्याच्या स्त्रोतासाठी तत्कालीन आमदार बसाप्पण्णा अरगावी यांनी या तलावाची निर्मिती केली होती. त्यावेळी नंदगड गावचे ग्रामस्थ याच पाण्याचा उपयोग करून आपले जीवन कंठत होते. अलीकडे नळपाणी योजना अस्तित्वात आल्यानंतर या तलावाकडे लघुपाटबंधारे खात्याने साफ दुर्लक्ष केले आहे. तलावामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या जलपर्णी, शेवाळ व जल वनस्पतींमुळे पाण्याचा साठा कमी होत चालला आहे.
तसेच तलावाची देखभाल नसल्याने आणि खोलबंदी केली नसल्याने तलावात पाणी साठण्याची क्षमता पूर्णपणे कमी झाली आहे. याचा परिणाम परिसरातील शेती, विहिरींची पाणी पातळी, कूपनलिकांची पाणी पातळी याच्यावर होण्याची शक्यता आहे. तलावात साचलेली जलवनस्पती वेळोवेळी काढून टाकणे, गाळ काढणे आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवणे अत्यावश्यक आहे. लघु पाटबंधारे खाते आणि ग्रा. पं. यांनी तलावाची स्वच्छता आणि खोलबंदीसाठी रोहयोतून काम हाती घेणे गरजेचे आहे. येत्या एप्रिल व मे महिन्यात तलावाची स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
प्लास्टिक-टाकाऊ वस्तूंमुळे तलावातील पाणी दूषित
मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व टाकाऊ वस्तू तसेच कचरा साठल्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. या अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डासांची वाढ, संसर्गजन्य आजारांचा धोका, अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Source link



