Uncategorized

जागते रहो! शहराचा कायापालट होत आहे….

एप्रिल फूल (स्वप्ने पाहण्यास काय हरकत आहे?)

मनीषा सुभेदार/बेळगाव

आज 1 एप्रिल, एप्रिल फूल करण्याचा दिवस. याचा इतिहास काही असो, पण या दिवशी आपल्या जवळच्या माणसांचा एप्रिल फूल करण्याची गंमत अनेकजण घेतात. सामान्य जनतेचा हा एकच दिवस नव्हे तर अनेकवेळा ‘एप्रिल फूल’ होत असतो. तो कोण करते हे ज्याचे त्याने ठरवावे. त्याचेच हे प्रतिबिंब पहा…

युद्ध संपणार?

युद्ध नको शांतता हवी, अशी मागणी जगभरातील स्त्री चळवळी आणि मानवतावादी कार्यकर्ते नेहमीच करत आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मागणीची नोंद घेऊन युद्ध समाप्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता जगभरात पेट्रोलची टंचाई जवळजवळ समाप्त झाली असून आता पेट्रोल मुबलक प्रमाणात मिळणार आहे. कोणीही पेट्रोल साठा करू नये असे सांगूनही ज्यांनी पेट्रोलचा साठा केला त्यांनी आता सदर पेट्रोल माफक दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

कमर्शियल सिलिंडरची आवक

युद्ध संपल्याने आता कमर्शियल सिलिंडरची आवक बेळगावमध्ये झालेली आहे. आता सर्व हॉटेल व्यावसायिकांना सिलिंडर तर मिळणारच आहे. परंतु गेल्या महिन्यात त्यांना सिलिंडर न मिळाल्याने त्याची भरपाई म्हणून चार चार सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल कृतज्ञता म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी जे पदार्थ टंचाईच्या काळात ग्राहकांना मिळाले नाहीत ते पदार्थ निम्म्या दरात देण्याचा निर्णय घेतला आहे.

24 तास पाणी मिळणार…

उन्हाळा सुरू झाला असून नेहमी उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. परंतु यंदा बेळगावकरांचे नशीब फळफळले आहे. एलअॅण्डटीने आता 24 तास पाणी योजना संपूर्ण परिसरात कार्यान्वित करून जनतेला खूष केले आहे. याशिवाय पाणी गळती यापुढे दिसण्याची शक्यता कमी असेल, अशी ग्वाही पण दिली आहे. पाणी नसल्याने जनतेच्या तोंडचे पाणी पळते आणि महिलांच्या डोळ्यात पाणी तरळते. मात्र यापुढे असे चित्र दिसणार नाही.

पदपथ मुक्त झाले

शहरातील वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांची नेहमीच कोंडी होते. या शहरात पादचाऱ्यांना सहजपणे चालता येईल, अशा जागाच राहिल्या नाहीत. परंतु बेळगावकरांच्या प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल (?) घेणाऱ्या महानगरपालिकेने पदपथांवरील सर्व अतिक्रमणे हटवून पदपथ मोकळे केले आहेत. त्यामुळे नागरिकांना व ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना महानगरपालिकेच्या उपकारांतून कसे उतराई व्हावे, असा प्रश्न पडला आहे.

बसथांब्यांना सुरक्षा

स्मार्ट सिटीअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या बसथांब्यांची दुरवस्था आपल्याला माहीतच आहे. हे बसथांबे म्हणजे मोकाट जनावरांचे, निराधारांचे आश्रयस्थान झाले आहेत. यामुळे जनावरे थांब्यांमध्ये व प्रवासी रस्त्यांवर असे दुर्भाग्य प्रवाशांनी नेहमीच अनुभवले. परंतु परिवहन मंडळ, कॅन्टोन्मेंट यांच्यातील सामंजस्य करारामुळे यापुढे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बस थांब्यांवर सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांची सोय होईलच. परंतु रोडरोमिओंचा उपद्रवसुद्धा टळणार आहे.

ई-आस्थी मिळणार क्षणात

महानगरपालिकेने आजपर्यंत झालेले लोकांचे आरोप, टीका-टिप्पणी हे सर्व खोडून काढायचे ठरविले आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब, ही म्हण खोटी ठरविण्याचा वज्रनिर्धार महानगरपालिकेने केला आहे. त्यामुळे यापुढे मनपात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची आणि मागणीची त्वरीत दखल घेऊन तिचे निराकरण करण्यात येणार आहे. जन्म-मृत्यू दाखला असो, ई-आस्थी असो किंवा अन्य कोणतेही काम असो नागरिकांना खोळंबून ठेवायचे नाही, असा आदेशच आयुक्तांनी दिला आहे.

‘आनंदी आनंद गडे’

सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण ही बेळगावकरांची नवीन डोकेदुखी आहे. पोलीस आणि बेळगावकर यांचे मैत्रीपूर्ण (?) संबंध सर्वांना ज्ञात आहेत. लोकांच्या पैशांची सुरक्षितता ही आमची जबाबदारी असे नवीन घोषवाक्य पोलीस प्रशासनाने तयार केले आहे. त्यामुळे आता यापुढे सायबर गुन्हेगारी होणार नाही. त्याचबरोबर तमाम बेळगावकरांची सुरक्षितता हेच आमचे प्रधान कर्तव्य असेल, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांसह तमाम पोलीस दलाने दिल्याने ‘आनंद पोटात मावेना’ अशी जनतेची अवस्था झाली आहे.

बॅरिकेड्स हटले

वर्षानुवर्षे मागणी करूनही दुर्लक्ष केले गेलेले पहिल्या रेल्वेगेट जवळचे बॅरिकेड्स हटविण्यात आल्याने सुभाष घोलप व  बॅरिकेड्स हटाव संघटनेला अभूतपूर्व यश. या संघटनेने आनंदोत्सव साजरा करून परिसरातील प्रत्येक नागरिकाला, प्रवाशांना पेढे वाटप केले.

मोबाईल विसरा, पुस्तक धरा

मुख्यमंत्र्यांनी मुलांच्या डिजीटल स्क्रिनचा कालावधी कमी करावा, अशी सूचना केली आहे. पालकांनी जरी ही बाब गांभीर्याने घेतली नाही तरी मुलांनी मात्र त्याचे गांभीर्य ओळखले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि मुलांनी आता मोबाईलला हात लावणार नाही, अशी प्रतिज्ञा केली आहे. इतकेच नव्हे तर ‘मोबाईल विसरा, पुस्तक हाती धरा’ असे अभियान 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून हाती घेण्याचे ठरविले आहे. मुलांची ही प्रतिज्ञा ऐकून पालक धन्य धन्य झाले आहेत.

मधूर मधूर वार्ता

युद्धाच्या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाचे दर 500 ते 600 रुपयांनी वाढले. मात्र आधीच  महागाईच्या वणव्यात आणि उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या नागरिकांना किमान गारवा मिळावा म्हणून खाद्यतेल व्यापाऱ्यांनी आता 100 रुपये किलो या दराने तेल देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जमल्यास साखरेचा दरही कमी करून निम्म्या दराने साखर देण्याबाबत चर्चा सुरू आहे. ही गोड वार्ता ते कधी जाहीर करतात याची प्रतीक्षा करावी लागेल.

कोण आनंदी? रसिक की पत्रकार?

बेळगावमध्ये ‘कार्यक्रमच कार्यक्रम चहूकडे’, ‘जावे रसिकांनी कुणीकडे’ या तरुण भारतमधील वृत्ताची दखल साहित्य व संस्कृती मंडळाने मनावर घेतली आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येकाचे स्वतंत्र व्यासपीठ, प्रत्येकाची प्रसिद्धीची हौस, आमचा कार्यक्रम चांगला की तुमचा अशी स्पर्धा या सर्व मतभेदांना मूठमाती देऊन तमाम सांस्कृतिक संघटनांनी एकत्र येऊन भव्यदिव्य कार्यक्रम करण्याचे ठरविले आहे. याचा आनंद रसिकांना तर होणारच आहे. परंतु या निर्णयामुळे पत्रकार अधिक आनंदित झाले आहेत. कारण त्यांच्यासाठी जायचे कुणीकडे या प्रश्नाचे उत्तर आता सोपे झाले आहे.

निवांत करा आंदोलने

वाढता उन्हाळा, अवेळी येणारा पाऊस, याशिवाय वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करण्याऐवजी पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेतला होता. अद्यापपर्यंत त्यांना याची पूर्तता करणे अशक्य झाले. तरी या एप्रिलपासून चन्नम्मा चौकात कोणतीही आंदोलने न करता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खास उभारण्यात आलेल्या शेडमध्ये म्हणजेच सावलीमध्ये आंदोलन करावे व ऊन, पावसापासून स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

चकाकती स्वच्छतागृहे

शहरात सेवाभावी संस्थांनी अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे उभी केली. परंतु महानगरपालिका त्यांची देखभाल करण्यास असमर्थ ठरली. मात्र, आता एलअॅण्डटीच्या सहकार्याने सर्व स्वच्छतागृहांना आधुनिकतेचा साज चढविण्यात येणार आहे. त्यामुळे भरपूर पाणी, बेसिन, हँडवॉश, नॅपकिन्स, वेंडींग मशिन्स अशा सर्व सुविधा स्वच्छतागृहात मिळणार असल्याने बेळगावकर हे स्वप्न तर नव्हे? असा प्रश्न करत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​