सत्ताधारी-विरोधक संसदेबाहेर आमनेसामने

लोकसभा-राज्यसभेचे कामकाज ठप्पच : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलनही सुरू
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार आमनेसामने आल्याने संसद भवनाबाहेर जोरदार संघर्ष झाला. विरोधी पक्षांनी नीट पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याचदरम्यान, रालोआचे खासदारही संसदेबाहेर पोहोचले. 21 जुलै रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी केलेल्या धरणे आंदोलनाबाबत सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने संसद परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तसेच सभागृहातही बराचवेळ गोंधळ सुरू राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वारावर एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, खर्गे आणि अखिलेश यादव या आंदोलनात सामील झाले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांच्या आंदोलनामुळे संसदेबाहेर गर्दी झाली होती. संसदेत उपस्थित राहण्यासाठी जात असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. याचदरम्यान एनडीएचे खासदारही तेथे दाखल झाल्यानंतर दोघांचीही एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.
21 जुलै रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाचा एनडीएचे खासदार निषेध करताना दिसून आले. तर, विरोधी पक्षाचे खासदार नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. आंदोलनादरम्यान प्रियांका गांधी एनडीएच्या खासदारांकडे गेल्या, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्यांना रोखले. संसदेच्या आतही गोंधळ सुरूच होता. यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी 2 वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर प्रचंड गोंधळ झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
प्रियांका गांधींचा सरकारवर निशाणा
काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ‘पंतप्रधान देशाच्या प्रत्येक कामगिरीचे श्रेय घेतात. त्याचप्रमाणे आता त्यांनी नीट पेपरफुटीची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे.’ असे स्पष्ट केले. जर हजारो तरुण आंदोलन करत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल, तर त्यासाठी पंतप्रधान जबाबदार आहेत. आंदोलकांपैकी एकालाही काही झाल्यास, ती सरकारची जबाबदारी आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
सरकार चर्चेसाठी पूर्णपणे तयार : रिजिजू
केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहात पुन्हा एकदा सरकारची बाजू स्पष्टपणे नमूद केली. सरकार नीट पेपरफुटीवर लोकसभा आणि राज्यसभेत कोणत्याही प्रकारे, कोणत्याही तारखेला आणि विरोधी पक्षांची इच्छा असेपर्यंत चर्चा करण्यास तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्स’ पोस्टचा संदर्भ देत त्यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू करण्याची सरकारची इच्छा असल्याचेही सांगितले. बुधवारी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांशी चर्चा केली आणि तोडगा काढण्यास सर्वजण सहमत झाले, परंतु नंतर विरोधकांनी अटी लादण्यास सुरुवात केल्याचा दावा त्यांनी केला. आता आम्ही काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांशी वैयक्तिकरित्या बोलून त्यांना सूचना देण्यासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही हात जोडून विरोधकांना विनंती करतो की, चर्चा कधी सुरू करायची हे त्यांनी ठरवावे. सरकार तयार आहे, पण विरोधक अटी लादत आहेत. त्यांना केवळ ही चर्चा टाळायची आहे, असा आरोप रिजिजू यांनी केला.
Source link



