वेंगुर्ल्यात विनापरवाना कीटकनाशकांचा साठा जप्त

वेंगुर्ले / प्रतिनिधी : वेंगुर्ले शहरातील तुळस रोड परिसरात राऊळवाडा येथे विनापरवाना आणि नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी वेंगुर्ला तालुका कृषी विभागाने कठोर पावले उचलली आहेत. ‘श्रीराम कृषी केंद्रा’शी संबंधित संचालक रामराजा सुरेश लामकाणे यांच्याविरुद्ध वेंगुर्ला पोलीस ठाण्यात कीटकनाशक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत तब्बल ३० लाख ९३ हजार ४१५ रुपये किमतीचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे.
२० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ला शहरातील तुळस रोड, राऊळवाडा, नायरा पेट्रोल पंपाजवळ ही धडक कारवाई करण्यात आली. कृषी विभागाचे गुणनियंत्रण अधिकारी प्रकाश मोहिते यांनी या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या कारवाईत जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख राहुल माने, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले आणि कृषी सेवक पंकज पाटील यांनी सहभाग घेतला. तुळसमार्गे रोड परिसरातील श्रीराम कृषी केंद्राच्या जवळ तसेच विक्री केंद्रासमोरील रस्त्याकडील एका मांगरामध्ये (गोडावूनसदृश जागा) हा साठा विनापरवाना लपवून ठेवण्यात आला होता.
*पथकाने केलेल्या प्राथमिक तपासात खालील गंभीर बाबी उघडकीस आल्या*
1) संबंधित ठिकाणी कीटकनाशकांच्या साठवणुकीचा व विक्रीचा कोणताही कायदेशीर परवाना नव्हता.
2) नियमानुसार आवश्यक असलेले साठा रजिस्टर, खरेदी बिले आणि विक्री बिले जागेवर उपलब्ध नव्हती.
3) विक्री केंद्राच्या दर्शनी भागात कीटकनाशकांची नावे व दर दर्शविणारा फलक लावलेला नव्हता.
पथकाने विविध नामांकित कंपन्यांच्या २६ वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे. एकूण साठा: १,६१४.७५ किलो/लिटर (अंदाजे किंमत ३०,९३,४१५ रुपये). महाराष्ट्र राज्यात कीटकनाशकांची साठवणूक आणि विक्रीसाठी शासनाचे परवाना घेणे व निर्धारित नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे. वेंगुर्ला तालुक्यात चालू हंगामात बेकायदेशीर खते व कृषी निविष्ठांच्या विक्रीविरोधात कृषी विभागाने विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गतच ही मोठी कारवाई झाल्याने कृषी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार आणि कायदेशीर कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी ही तपासणी मोहीम अशीच सुरू राहणार असून, प्रकरणाचा पुढील तपास वेंगुर्ला पोलीस करत आहेत
Source link



