राष्ट्रीय महामार्गावरील अपुऱ्या दिशादर्शक फलकांमुळे वाहनचालक संभ्रमात

सावंतवाडी प्रतिनिधी : बांदा–संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग आंबोली घाटमार्गे सावंतवाडीपर्यंत आला आहे. मात्र, या राष्ट्रीय महामार्गालगत अनेक छोटी-मोठी गावे असून, त्या गावांकडे जाण्यासाठी आवश्यक दिशादर्शक फलक योग्य पद्धतीने लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
आंबोली–सावंतवाडी–बेळगाव मार्गावरील धवडकी येथे सांगेली, कलंबिस्त आदी पंचक्रोशीकडे जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्यमार्ग आहे. मात्र, या ठिकाणी लावण्यात आलेला दिशादर्शक फलक चुकीच्या पद्धतीने असल्याने अनेक वाहनचालकांची गैरसोय होत आहे. वास्तविक, या फलकावर संबंधित सर्व गावांची सविस्तर माहिती असणे अपेक्षित असताना, त्यावर केवळ सांगेली’ या गावाचाच उल्लेख करण्यात आला आहे.
या परिसरात कलंबिस्त, शिरशिंगे, वेर्ले यांसारखी महत्त्वाची गावे असूनही त्यांचा फलकावर उल्लेख नाही. त्यामुळे ही गावे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नजरेतून गायब झाली आहेत का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते बाळा गावडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अशाच प्रकारची परिस्थिती राष्ट्रीय महामार्गावरील इतर अनेक ठिकाणीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधून, तातडीने योग्य दिशादर्शक फलक उभारण्याची मागणी केली आहे.
Source link



