राज्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

जानेवारी ते एप्रिलमध्ये 3,939 घटना तर 39 जणांचा मृत्यू : ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव, शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन
बेळगाव : राज्यात सर्पदंशाच्या वाढत्या घटनांनी आरोग्य विभागासमोर गंभीर आव्हान उभे केले आहे. सर्पदंशाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सरकारकडून विशेष कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू असतानाच यावषी सर्पदंशाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. एकात्मकि रोग निगराणी कार्यक्रमच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल 2026 अखेरपर्यंत राज्यात सर्पदंशाच्या तब्बल 3,939 घटना नोंदविण्यात आल्या असून त्यापैकी 39 जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ एप्रिल महिन्यातच 961 सर्पदंशाच्या घटना आणि 11 मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्याच्या तुलनेत 2025 मध्ये याच कालावधीत 3,295 सर्पदंशाच्या घटना व 19 मृत्यू नोंदविण्यात आले होते. तर 2024 मध्ये 2,056 घटना आणि 11 मृत्यूची नोंद झाली होती. या आकडेवारीवरून गेल्या दोन वर्षांत सर्पदंशाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. वाढते तापमान, बदलते हवामान आणि ऋतुमानातील अस्थिरता ही सर्पदंशाच्या वाढत्या घटनांमागील प्रमुख कारणे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत साप थंड जागांच्या शोधात मानवी वस्त्यांकडे वळतात. तसेच पावसाळ्याच्या सुऊवातीला शेतीची कामे सुरू होत असल्याने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा सापांशी संपर्क वाढतो.
विशेषत: मे ते सप्टेंबर या कालावधीत सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडत असल्याचे समजते. याकाळात शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात काम करत असतात. पिकांची मशागत, गवत कापणी, पाण्याच्या नाल्यांजवळील कामे यामुळे मानव-सर्प संघर्षाच्या घटना वाढतात. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये कर्नाटक सार्वजनिक आरोग्य कायदा 2020 अंतर्गत सर्पदंश हा प्रतिबंध करण्यायोग्य आजार म्हणून घोषित करण्यात आला होता. त्यानंतर सर्पदंशाच्या घटनांची अधिक प्रभावी नोंदणी सुरू झाल्याने आकडेवारी वाढल्याचेही समजते.
आरोग्य विभागाने राज्यातील बहुतांश सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील प्रतिविष (अॅन्टीस्नेक वेनम) औषधे उपलब्ध करून दिली आहेत. तसेच उपचार पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. सरकारने सर्पदंशावरील उपचार पूर्णपणे मोफत असल्याचे जाहीर केले असले तरी ग्रामीण भागात याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना सर्पदंश झाल्यानंतर कोणती प्राथमिक वैद्यकीय मदत घ्यावी, कोणत्या ऊग्णालयात जावे किंवा कोणत्या उपचारपद्धतीवर विश्वास ठेवावा याची माहिती नसते. परिणामी अनेक जण अंधश्र्रद्धा, झाडफुक किंवा पारंपरिक उपचारांकडे वळतात, ज्यामुळे जीवितहानी वाढण्याची शक्मयता असते.
नागरिकांना सर्पदंश टाळण्यासाठी काही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. शेतात काम करताना बूट व हातमोजे वापरणे, रात्री टॉर्चचा वापर करणे, घर परिसर स्वच्छ ठेवणे, गवताचे ढिग किंवा दगडाजवळ काळजीपूर्वक वावरणे आणि सर्पदंश झाल्यास तातडीने जवळच्या सरकारी ऊग्णालयात उपचार घेणे आवश्यक आहे. राज्यात सर्पदंशाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात व्यापक जनजागृती मोहीम, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि पुरेशा प्रमाणात प्रतिविष औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Source link



