रशियन तेल टर्मिनलवर युक्रेनचा हल्ला

वृत्तसंस्था/ कीव
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, युक्रेनने पुन्हा एकदा रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. शनिवारी, रशियाचे दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या सेंट पीटर्सबर्गमधील एका तेल टर्मिनलवर युक्रेनियन ड्रोन हल्ला झाला. रशियन अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून हा हल्ला शहराच्या किरोव्स्की जिह्यात झाल्याचे स्पष्ट केले.
हल्ला झालेले ठिकाण बाल्टिक समुद्रावर असून तेथे एक तेल टर्मिनल आहे. या हल्ल्यात तेल टर्मिनलचे नुकसान झाले असले तरी, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सेंट पीटर्सबर्गचे गव्हर्नर अलेक्झांडर बेग्लोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, रशियन हवाई संरक्षण प्रणालीने शहरात आणि आसपासच्या परिसरात 72 युक्रेनियन ड्रोन पाडले.
रशियाची युद्धयंत्रणा कमकुवत करणार : झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे वर्णन रशियावरील ‘दूरगामी निर्बंध’ असे केले आहे. युक्रेनियन सैन्याने केवळ तेल टर्मिनललाच नव्हे, तर सेंट पीटर्सबर्गजवळील क्रोनस्टाड बेटावरील एका महत्त्वाच्या लष्करी तळालाही लक्ष्य केले होते. रशियाच्या तेल पायाभूत सुविधांमधून मिळणारा पैसा त्यांच्या युद्धयंत्रणेला बळकट करतो, म्हणूनच अशा सुविधांवर हल्ले केले जात आहेत, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर पुतिन यांचाही इशारा
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या ऊर्जा सुविधांवरील हल्ल्यांना कमी लेखले आहे. जोपर्यंत रशियाची उद्दिष्ट्यो साध्य होत नाहीत, तोपर्यंत रशिया आपली लष्करी मोहीम सुरूच ठेवेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
रशियामध्ये इंधन संकट तीव्र
युक्रेन गेल्या काही महिन्यांपासून रशियाच्या तेल डेपो, रिफायनरी आणि इंधन साठवणूक सुविधांवर वारंवार ड्रोन हल्ले करत आहे. या हल्ल्यांमुळे रशियाच्या अनेक भागांमध्ये इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच सरकारवरील दबाव वाढला आहे. सेंट पीटर्सबर्गच्या याच भागावर जूनमध्येही हल्ला झाला होता.
क्राइमियातील हल्ल्यात एक ठार
सेंट पीटर्सबर्ग व्यतिरिक्त शनिवारी रशियाच्या ताब्यातील क्राइमियामध्ये युक्रेनने केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाली. तसेच 10 वर्षांच्या मुलासह इतर दोघे जखमी झाले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, या सततच्या हल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल विक्रीही थांबवण्यात आली आहे.
Source link



