भोई गल्लीतील गटारींच्या सफाईकडे मनपाचे दुर्लक्ष का?

स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात : मनपाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी
बेळगाव : शहर स्वच्छतेत बेळगाव महानगरपालिका आघाडीवर असल्याचा गवगवा करणाऱ्या मनपाचे पितळ उघडे पडत आहे. भोई गल्लीत गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहेत. तरीदेखील गटारींची सफाई करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्याबरोबर रहिवाशांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या समस्येकडे दुर्लक्ष करण्यामागचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहराच्या स्वच्छतेवर महानगरपालिकेकडून दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. तरीदेखील स्वच्छतेच्या बाबतीत बेळगाव पिछाडीवर आहे.
दरवर्षी देशभरातील स्वच्छ शहरांची निवड केली जाते. त्यात दरवर्षी बेळगाव मनपा पिछाडीवर पडत आहे. मात्र स्वत:चा गवगवा करण्यासाठी नागरिकांकडून स्वच्छ बेळगाव संदर्भात अभिप्राय मागविले जात आहे. मंगळवार दि. 5 रोजी अंगारकी संकष्टीनिमित्त हिंडलगा येथील गणपती मंदिरात भक्तांची गर्दी झाली होती. त्याठिकाणी मनपाच्या अधिकाऱ्यांनी आगळिक करत स्वच्छ सर्व्हेक्षणाबाबत नागरिकांची फिडबॅक घेतली. मात्र खरी परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिकडे तिकडे ड्रेनेज आणि गटारींच्या समस्या कायम आहेत. कचऱ्याची समस्या अद्याप सुटलेली नसून ब्लॅक स्पॉट तयार होत आहेत.
नागरी समस्यांबाबत महानगरपालिकेकडे तक्रारी करूनदेखील त्या वेळेवर मार्गी लावल्या जात नाही, अशी ओरड आहे. यापेक्षाही कळस म्हणजे शहराच्या मध्यमवर्गीय भागात असलेल्या भोई गल्लीतील गटारींचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. गटारी तुंबल्या असल्या तरी त्या स्वच्छ करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. परिणामी गटारीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाण्यावर डासांची पैदास वाढली आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही गटारींची स्वच्छता का केली जात नाही? यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल स्थानिक रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे.
Source link



