जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांची सदस्यपदी नियुक्ती

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर मालवण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव डॉ. श्रीपाद आर. पाटील यांनी अधिकृत नियुक्तीपत्र जारी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच पालकमंत्री यांच्या मान्यतेनंतर आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मंजुरीनुसार या समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीमध्ये विविध विभागांच्या प्रतिनिधींसह नगराध्यक्षा ममता वराडकर यांचा समावेश करण्यात आला असून, जिल्ह्यातील आरोग्यविषयक धोरणे, जनजागृती, आरोग्य सुविधा आणि लोकाभिमुख उपक्रमांच्या अंमलबजावणीत त्या सक्रिय सहभाग घेणार आहेत.
समितीच्या बैठकीची तारीख, वेळ व स्थळ याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असून, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी सर्व सदस्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या नियुक्तीमुळे मालवण शहराच्या आरोग्यविषयक प्रश्नांना जिल्हास्तरावर अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
“जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन आणि सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मालवण शहरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. या नियुक्तीसाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, तसेच महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि सर्व मान्यवरांचे मी मनःपूर्वक आभार मानते. सर्वांच्या सहकार्याने नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देते.” असे नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या आहेत.
Source link



