Uncategorized

कळंब्यात आज होणार मोठा हरित संकल्प

कळंबा : पर्यावरण संवर्धनाची चळवळ गावपातळीवर नेण्याच्या उद्देशाने कळंबा परिसरात ‘हरित कोल्हापूर’ अंतर्गत १० हजार वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ आज, शुक्रवार (दि. २६) सकाळी १० वाजता, कळंबा तलाव येथे होणार आहे. आमदार अमल महाडिक तसेच कळंबा भाजप व महायुती कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे कळंब्यातून हरितीकरणाचा व्यापक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या मोहिमेचा शुभारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या विनिता सागर भोगम कळंबा ग्रामपंचायत सरपंच सुमन गुरव उपसरपंच रोहित जगताप यांसह ग्रामपंचायत सदस्य तसेच कळंबा गावातील नागरिक, युवक, कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. ‘एक झाड, एक पाऊल, एक संकल्प’ या संदेशातून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सामूहिक पातळीवर स्वीकारण्याचा निर्धार या मोहिमेतून व्यक्त करण्यात येत आहे.

कळंबा गावातून सुरू होणाऱ्या या मोहिमेच्या माध्यमातून केवळ वृक्षलागवड न करता पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यावर भर दिला जाणार आहे. बदलते हवामान, वाढते प्रदूषण, घटते हरित क्षेत्र आणि पाण्याच्या पातळीत होत असलेली घसरण या पार्श्वभूमीवर वृक्षलागवडीचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. त्याच जाणिवेतून कळंब्यातून हरित उपक्रमाला चालना देत परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.

या मोहिमेतून शुद्ध हवा, पर्यावरण संतुलन, भूजलपातळी सुधारणा, तापमान वाढीवर नियंत्रण आणि भावी पिढ्यांसाठी हिरवे भविष्य घडविण्याचा संदेश दिला जाणार आहे. कळंबा तलाव परिसरासह इतर ठिकाणी टप्प्याटप्प्याने वृक्षलागवड करण्यात येणार असून, ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता पुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पर्यावरण रक्षणासाठी लोकसहभागातून उभी राहत असलेली ही मोहीम कळंब्याच्या सार्वजनिक उपक्रमांच्या परंपरेत आणखी एक महत्त्वाची भर मानली जात आहे. सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालत ‘हरित कोल्हापूर’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे. विशेष म्हणजे, वृक्षलागवडीनंतर झाडांचे संवर्धन, संगोपन आणि संरक्षण यावरही तितकाच भर दिला जाणार असल्याने, हा उपक्रम दीर्घकालीन परिणाम घडवून आणणारा ठरण्याची अपेक्षा आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने स्वतःहून पुढे येण्याची गरज असताना, कळंब्यातून सुरू होणारी ही मोहीम सामूहिक सहभागातून उभ्या राहणाऱ्या हरित चळवळीचे प्रतीक ठरणार आहे. गावातून सुरू होणारा हा उपक्रम शहर आणि परिसरासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​