उष्ण लाटांच्या विळख्यातील दक्षिण आशिया

चालू वर्षी दक्षिण आशियात उष्णतेचा कहर झाला आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या प्रदेशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेने भविष्यासाठी भयसूचक संकेत दिले आहेत. एकूणच आशिया खंड जागतिक सरासरी दरापेक्षा दुप्पट वेगाने उष्ण होत असल्याचे संशोधकांचे मत आहे. इ. स. 1990 ते 2021 दरम्यान जगभरात उष्णतेने होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू आशियात नोंदवले गेले. त्यातही दक्षिण आशियाचा वाटा मोठा आहे.
तसे पाहता आगामी काळाचा विचार केल्यास 2030 पर्यंत दक्षिण आशियातील जवळपास 90 टक्के लोकसंख्येस तीव्र उष्णतेचा सामना करावा लागेल, असा मान्यताप्राप्त हवामान संस्थांचा अंदाज आहे. अगदी नेपाळ व भूतान सारख्या उंचीवर वसलेल्या देशातही आता सातत्याने 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद होताना दिसते. या उष्णतेच्या लाटांमुळे हवामान बदलाने झालेली मानवी स्थलांतरे, नामशेष झालेल्या प्रजाती, लुप्त झालेल्या नद्या, शुष्क झालेले भू-प्रदेश आणि विस्तारित वाळवंट या संदर्भातील इतिहास आठवण्याची वेळ आणली आहे.
संशोधनांचे निष्कर्ष
अलीकडच्या विविध निरिक्षण प्रणाली आणि प्रारुप अभ्यास व संशोधनाने दक्षिण आशियातील अभूतपूर्व उष्णता हंगामांचे चित्र पुढे आणले आहे. उदाहरणार्थ 2022 मधील महाउष्णतेची लाट हिवाळा अखेर ते मान्सूनपूर्व असे चार ते पाच महिन्यांपर्यंत रेंगाळली होती. त्यामुळे जमिनीतील ओलाव्यात तीव्र कमतरता निर्माण होऊन पिक उत्पादनात लक्षणीय घट झाली होती. या स्वरुपाच्या घटना विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की, मानवनिर्मित कारणांमुळे उदभवलेल्या तापमानवाढीने भारत व पाकिस्तानात वसंत ऋतुच्या आरंभी येणाऱ्या उष्णता लाटांची शक्यता आणि तीव्रता या दोन्हीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. परिणामी औद्योगिक क्रांतीपूर्व हवामानाच्या तुलनेत टोकाच्या उष्णतामानाची शक्यता कित्येक पटींनी वाढली आहे. पृथ्वी पृष्ठभाग निरिक्षण, उपग्रह तंत्रज्ञान आणि पुनर्विश्लेषण माहिती संच एकत्रित करून साकारलेल्या दीर्घकालीन मूल्यांकनानुसार 1980 पासून भारतात स्थानिकदृष्ट्या विषम तापमानवाढीचे कल उघड झाले आहेत.
हवामान आंतरतुलना प्रयोगांनुसार इ. स. 2100 पर्यंत उच्च उत्सर्जन प्रदेशातील तापमानवाढीत 1 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. याचा परिणाम म्हणून उष्णता प्रवण क्षेत्र वाढून, दीर्घकाळ स्थिरावणाऱ्या उष्ण लाटांमुळे सार्वजनिक आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधांपुढे प्रतिकुलतेची गंभीर आव्हाने उभी होण्याचा धोका आहे. उपलब्ध माहितीनुसार 2024 हे पृथ्वीने आतापर्यंत अनुभवलेले सर्वात उष्ण वर्ष होते. यावर्षी एप्रिल महिन्यात नैत्य बांगलादेशातील मुन्शीगंजने मागील शतकातील सर्वात मोठ्या उष्ण लाटेचा अनुभव घेतला. 2025 मध्येही द. आशियातील उष्णतामानात फारसा फरक पडला नाही. यावर्षी देखील उष्णता उच्चांकी पातळीच्या जवळ जाताना दिसते आहे.
भारतातील परिस्थिती
भारतात सध्या अंदाजापेक्षा आधी तीव्र उष्णतेची लाट आली आहे. याबाबत, उच्च दाबाच्या प्रणाली प्रभावी असतात तेव्हा गरम हवा पृष्ठभागाजवळ घुमटासारखी बंदिस्त होते, तिला वर जाऊन थंड होण्यापासून रोखले जाते व त्यातून उष्णता अधिकाधिक वाढत जाते असे अनुमान निघाले आहे. याचबरोबर हवामानाशी संबंधित इतर काही घटकही उष्णतेस कारणीभूत ठरत आहेत. मान्सूनपूर्व (वळीव) पावसाचा अभाव व दीर्घकाळ टिकणारी एल निनोसारखी परिस्थिती थंडावा निर्माण होण्यास अडथळा आणत आहे, असे तज्ञांचे मत आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला होता व चालू महिन्यात देशाच्या पश्चिमी राज्यात व किनारपट्टीवर तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला होता. पूर्व किनारपट्टीवर, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या काही भागांमध्ये व गुजरात, महाराष्ट्र या पश्चिमी राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा नेहमीपेक्षा अधिक वारंवार येण्याची शक्यताही वर्तवली होती. हा अंदाज बऱ्यापैकी खरा असल्याची प्रचिती येत आहे. उष्णतेची परिसीमा इतकी की, 24 एप्रिल रोजी जगातील 90 हून अधिक उष्ण शहरे एकट्या भारतात होती.
उष्णता लाटेतील इतर देश
भारताचे शेजारी पाकिस्तान व बांगला देशही उष्णतेच्या संकटाचा सामना करत आहेत. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आणि बंगाल देशाच्या ढाकाच्या आसपासचे जिल्हे तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. हे संकट अनेक दिवस टिकू शकते, असा इशारा तेथील हवामान विभागाने दिला आहे. दक्षिणपूर्व आशियातील थायलंडला प्रखर उष्ण लाटांचा सामना करावा लागत असून बँकॉक प्रशासनाने धोकादायक उष्णतेचे अनेक इशारे जारी केले आहेत. साऱ्या सार्वजनिक आस्थापनांना वातानुकूलित यंत्रणा या काळात निरंतर सुरु ठेवण्याचे आदेश दिले गेलेत. फिलिपिन्स, मलेशिया, सिंगापूर या देशांनीही नागरिकांना उष्णतेचा सामना करण्यासाठीच्या सूचना जारी केल्या आहेत.
उष्णता वाढीचे परिणाम
उष्णता वाढीमुळे कृषी उत्पादनांवर विपरित परिणाम होतो. द. आशियाई देश विकसनशील व अविकसित गटात असल्याने औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गाकडे उष्णतेपासून बचाव करण्यासाठीची सुविधा उपलब्ध असते. परिणामी, कामाची क्षमता घटून उद्योगांची उत्पादन क्षमताही घटते. सेवा क्षेत्रातही याचेच प्रतिबिंब पडलेले दिसते. सर्वात थेट हानी मानवी शरीराची होते. उष्णतेच्या ताणामुळे शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी पडते. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण येतो, मूत्रपिंडांना इजा होते. झोपमोड होऊन एकाग्रता व कामावर परिणाम होतो. मधुमेह, श्वसनविकार आणि मानसिक आजारांसारख्या जुनाट व्याधी उचल खातात, वृद्ध, गर्भवती महिला, लहान मुले ज्यांना आधीपासून काही आजार आहेत, त्यांना सर्वात मोठा धोका असतो. भारतासारख्या देशात एकूण कामगार वर्गाच्या तीन चतुर्थांश म्हणजे अंदाजे 38 कोटी कामगार उष्णतेच्या संपर्कात राहून काम करतात. अति उष्णतेने कामाचे तास वाया गेल्याने मोबदला व रोजंदारी कमी होते, ज्याचे दूरगामी परिणाम पोषण व औषधोपचारांच्या उपलब्धतेवर होतात. हे परिणाम संपूर्ण उन्हाळ्यात वाढत जातात आणि क्वचितच त्याचे स्पष्ट कारण ‘उष्णता’ असल्याचे मानले जाते.
उपाय योजनांसाठी प्रयत्न
केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण उपखंडात तापमान वाढत असताना, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक हवामान संघटना यांच्या पुढाकाराने ‘ग्लोबल हीट हेल्थ इन्फॉर्मेशन नेटवर्कचे दक्षिण आशिया केंद्र’ गेल्या महिन्यात सुरु करण्यात आले आहे. वेलकॉम ट्रस्टच्या पाठिंब्याने हे केंद्र भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान शास्त्र संस्था आणि भारतीय हवामान विभाग, तसेच दक्षिण आशिया हवामान आणि आरोग्य विभागासोबत एकत्रितपणे काम करेल. या प्रदेशातील सरकारे, संशोधक आणि स्थानिक व्यावसायिकांना एका सामायिक ज्ञान जाळ्याशी जोडून अधिक स्पष्ट सूचना, सुरक्षित कामाचे तास आणि आरोग्य सेवांसाठी मजबूत धोरणात्मक पाठिंबा यावर लक्ष केंद्रित करून परिस्थिती बदलण्याची या केंद्राची योजना आहे. एकीकडे उत्सर्जन व प्रदूषण या तापमानवाढीसाठी कारणीभूत घटकांवर उपाय शोधण्याची प्रक्रिया तीव्र करण्याची गरज असताना अशा केंद्राची त्याला जोड मिळणे म्हणूनच स्वागतार्ह ठरते.
अनिल आजगांवकर
Source link



