आरसीबीचा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश

गुजरात टायटन्सवर 92 धावांनी विजय, गुजरातला आणखी एक संधी, सामनावीर पाटीदारचे स्फोटक अर्धशतक, जेकब डफीचे 3 बळी
वृत्तसंस्था, धरमशाला
फलंदाजीत हाराकिरी आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे गुजरात टायटन्सला मंगळवारच्या सामन्यात विद्यमान विजेत्या आरसीबीने पहिल्या क्वालिफायर लढतीत 92 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली. सामनावीर रजत पाटीदारची स्फोटक फलंदाजी या सामन्याचे वैशिष्ट्या ठरले.
गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर आरसीबीला फलंदाजीचे निमंत्रण दिले. कर्णधार रजत पाटीदारच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने 20 षटकांत 5 बाद 254 धावांचा डोंगर उभारला.
मंगळवारचा हा प्लेऑफमधील पहिला क्वॉलिफायर सामना चुरशीचा होईल, अशा आशेने शौकिनांनी गर्दी केली होती. पण आतापर्यंत कामगिरीत सातत्य राखणाऱ्या गुजरात टायटन्सच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे आरसीबीला 254 धावांपर्यंत मजल मारण्यात मदत झाली. तसेच गुजरात टायटन्सची गोलंदाजीही परिणामकारक ठरु शकली नाही. आरसीबीच्या प्रत्येक फलंदाजाने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजीवर भर दिला होता.
आरसीबीच्या डावाला प्रारंभ झाल्यानंतर मोहम्मद सिराजच्या पहिल्या षटकांत सलामीच्या व्यंकटेश अय्यरने तीन अप्रतिम चौकार ठोकून 19 धावा झोडपल्या. त्यानंतर रबाडाच्या षटकांत अय्यरने 1 षटकारही खेचला. पण रबाडानेच अय्यरला गिलकरवी झेलबाद केले. त्याने 7 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. मोहम्मद सिराजच्या तुलनेत रबाडाची गोलंदाजी अधिक भेदक असल्याने विराट कोहली जपूनच खेळत होता. दरम्यान, होल्डरच्या गोलंदाजीवर कोहलीचा त्रिफळा उडाला. त्याने 25 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 43 धावा झोडपल्या. त्यानंतर देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार आणि कृणाल पांड्या यांनी धावांचा वेग अधिक वाढविला. गुजरातच्या गोलंदाजांनी खेळाच्या मधल्या टप्प्यात थोडीफार परिणामकारक गोलंदाजी केली. होल्डरच्या एका षटकांतील तीन चेंडूच्या अंतरात देवदत्त पडीक्कल आणि कोहली बाद झाले. पडीक्कलने 19 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. गुजरातचा गोलंदाज खेजरोलियाच्या 2 षटकांमध्ये पाटीदारने तुफान फटकेबाजी केली. डावातील 14 व्या षटकांत पाटीदारने आपल्या फटकेबाजीच्या जोरावर संघाला भक्कम स्थितीत नेले. प्रसिद्ध कृष्णाच्या षटकांत पाटीदारला 18 आणि 20 धावांवर गुजरातकडून जीवदाने मिळाली. या जीवदानाचा पुरेपूर लाभ आरसीबीने उठविला. खेजरोलिया आणि रशिद खानच्या गोलंदाजीवर पाटीदारने तसेच कृणाल पांड्याने तुफान फटकेबाजी केली. रबाडाने कृणाल पांड्याला साईसुदर्शनकरवी झेलबाद केले. त्याने 28 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 43 धावा झळकविल्या. प्रसिद्ध कृष्णाने डेविडचा 4 धावांवर त्रिफळा उडविला.
आरसीबीने शेवटच्या दोन षटकांत 40 धावा झोडपल्या. जितेश शर्माने 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 15 धावा जमविल्या. कर्णधार रजत पाटीदारने रबाडाच्या गोलंदाजीवर षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून आपल्या संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडून दिला.
आरसीबीच्या डावामध्ये 14 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. आरसीबीने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकांत 76 धावा जमविताना एकमेव गडी गमविला. कोहली आणि पडिक्कल यांनी अर्धशतकी भागिदारी 23 चेंडूत नोंदविली. आरसीबीने 10.1 षटकांत शतक पूर्ण केले. पाटीदारने 33 चेंडूत 9 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 93 धावा झळकविल्या. पाटीदारचे या स्पर्धेतील हे पाचवे अर्धशतक आहे. आरसीबीचे द्विशतक 102 चेंडूत तर 250 धावा 120 चेंडूत नोंदविल्या गेल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरात टायटन्सचा डाव 19.3 षटकांत 162 धावांत आटोपला. राहुल तेवातिया आणि जोस बटलर वगळता गुजरातचे इतर फलंदाज चुकीच्या फटकेबाजीमुळे लवकर बाद झाले. तेवातियाने 43 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह 68 तर बटलरने 11 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 29, तसेच सलामीच्या साईसुदर्शने 9 चेंडूत 3 चौकारांसह 14 धावा जमविल्या. कर्णधार गिल 2 धावांवर बाद झाला. आरसीबीतर्फे डफीने 3 तर भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या आणि रसिख सलाम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हॅजलवूडने 1 बळी मिळविला. गुजरातच्या डावात 7 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. आरसीबीच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर गुजरातचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. गुजरातने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 51 धावांत 5 गडी गमविले होते.
संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकांत 5 बाद 254 (पाटीदार 33 चेंडूत 9 षटकार, 5 चौकारांसह नाबाद 93, कोहली 43, कृणाल पांड्या 43, व्यंकटेश अय्यर 19, पडीक्कल 30, डेव्हीड 4, जितेश शर्मा नाबाद 15, अवांतर 7, होल्डर 2-39, रबाडा 2-54, प्रसिद्ध कृष्णा 1-53). गुजरात टायटन्स 19.3 षटकांत सर्वबाद 162 (राहुल तेवातिया 68, बटलर 29, साईसुदर्शन 14, अवांतर 8, डफी 3-39, भुवनेश्वरकुमार, कृणाल पांड्या, रसिख सलाम प्रत्येकी 2 बळी, हॅजलवूड 1-39).
-आयपीएल प्लेऑफमधील नोंदली गेली आजवरची सर्वोच्च धावसंख्या
-आरसीबीने शेवटच्या 6 षटकांत केली 114 धावांची आतषबाजी
-रजत पाटीदारने आपल्या शेवटच्या 19 चेंडूत तडकावल्या 71 धावा
-कोहलीने सर्वाधिक 282 आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम नोंदवताना रोहित शर्माला (281) मागे टाकले
Source link



