Dahivadi accident | भीषण अपघात आणि पाठलाग! दहिवडीत टाटा पंचने दुचाकीला उडवलं; टायर फुटलेल्या अवस्थेत कार पळवण्याचा थरार

दहिवडीजवळ भीषण अपघात; कारच्या धडकेत दोन युवक गंभीर
सातारा – सातारा माण तालुक्यातील दहिवडी-गोंदवले मार्गावरील खडक ओढ्याजवळील धोकादायक वळणावर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. टाटा पंच कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन युवक गंभीर जखमी झाले अपघातानंतर चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
दहिवडीकडे येत असताना खडक ओढ्यानजिकच्या वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळली. धडकेनंतर दुचाकीवरील दोन्ही युवक दूर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने मदत करत त्यांना उपचारासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.अपघातात कारचा मागील डाबा टायर फुटला होता. तरीही चालकाने गाडी न थांबवता वेगाने दहिवडीकडे पळ काढला. प्रत्यक्षदर्शीनी प्रसंगावधान राखत कारचा पाठलाग केला.
दरम्यान, फुटलेल्या टायरवर धावणाऱ्या कारने पेट्रोल पंपाजवळ आणखी दोन दुचाकींना धडक देण्याचा धोका निर्माण केला. पुढे चालकाने भवानबाडी रोडकडे वळण घेत बालाजी मंगल कार्यालयाशेजारी अंधारात कार उभी केली आणि पसार होण्याचा प्रयत्न केला.
मात्र पाठलागकरणाऱ्या युवकांनी तत्काळ दहिवडी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार जप्त केली. सदर कार मलबडे येथील असल्याचे समजते. चालक व त्याच्यासोबत असलेली महिला नंतर स्वतःहून दहिवडी पोलीस ठाण्यात हजर झाले. जखमी युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दहिवडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Source link


