Uncategorized

मराठा आंदोलनात ‘GEN Z’ची एन्ट्री; शाळकरी मुलींच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले; सोलापूरच्या आंदोलनाच्या इतिहासातील लक्षणीय सहभाग; मागण्यांवर निर्णय घेण्याची सरकारकडे मागणी

सोलापूर / प्रतिनिधी : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शाळकरी मुली आणि ‘GEN Z’ पिढीतील विद्यार्थिनी सहभागी झाल्याने आंदोलनाची विशेष चर्चा झाली.

विद्यार्थिनींनी दिलेल्या जोरदार घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. सोलापूरमधील मराठा समाजाच्या आंदोलनात शाळकरी विद्यार्थिनींचा एवढ्या थेट स्वरूपातील सहभाग प्रथमच लक्षणीय ठरल्याचा दावा आंदोलकांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या विविध मागण्यांना समर्थन देत सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, हैदराबाद गॅझेटनुसार शासनाने काढलेल्या जीआरची अंमलबजावणी करून कुणबी दाखले देण्यात यावेत, सारथी संस्थेच्या बंद करण्यात आलेल्या विविध योजना पुन्हा सुरू कराव्यात तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी देऊन मराठा तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी आर्थिक मदत सुरळीत करावी, अशा मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या.

जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला.

दरम्यान, शाळकरी मुली आणि ‘GEN Z’ विद्यार्थ्यांचा आंदोलनातील थेट सहभाग हा यावेळी विशेष ठरला. विद्यार्थिनींच्या घोषणांमुळे आंदोलनाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांची संवेदनशीलता चर्चेत

शाळकरी मुलींनी निवेदन सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्तिकेयन स्वतः उठून उभे राहिले आणि त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. ‘जिल्हाधिकारी या नात्याने तुम्हाला आणखी काय मदत करू शकतो, ते आवर्जून सांगा,’ असे त्यांनी मुलींना सांगितले.

यावेळी त्यांनी विद्यार्थिनींच्या भविष्यातील स्वप्नांविषयीही विचारणा केली. काही मुलींनी खाकी वर्दी परिधान करण्याची इच्छा व्यक्त केली, तर काहींनी नौदल, लष्कर तसेच वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींशी आपुलकीने संवाद साधल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी सकल मराठा समाजाचे माऊली पवार, ज्ञानेश्वर सपाटे, शिवाजी चापले, शिवाजी भोसले, मारुती सावंत, सुनील शेळके, दिनेश डोंगरे, सचिन तिकटे, अशोक भोसले, चंद्रकांत पात्रे, तानाजी माने, राहुल मन्नापुरे, रोहन हावळे, किरण देशमुख, सुरेश जगताप, जनार्दन चव्हाण आदी उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​