झाराप-पत्रादेवी मार्गावर वेत्ये येथे भीषण अपघात; 21 वर्षीय युवतीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

सावंतवाडी / वार्ताहर : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी मार्गावर वेत्ये येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात 21 वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी हा अपघात घडला.
मृत युवतीचे नाव शोभा ॲन्थनी फर्नांडिस (वय २१, रा. मडगाव, गोवा) असे आहे. जखमींमध्ये एक जण गोव्यातील, तर अन्य दोघे मडुरा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा-मडगाव आणि कुंकवळी परिसरातील काही मित्र-मैत्रिणी दुचाकींवरून आंबोली येथील वर्षा पर्यटनस्थळी जात होते. वेत्ये येथे पुढे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे पाठीमागून येणारी मडगाव येथील बुलेट दुचाकी पुढील वाहनावर जोरदार आदळली.
या धडकेत बुलेटच्या मागील सीटवर बसलेली शोभा फर्नांडिस रस्त्यावर फेकली गेल्याने गंभीर जखमी झाली. तसेच अन्य तिघांनाही दुखापत झाली.
अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असलेल्या शोभा फर्नांडिस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी मडुरा येथील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी (गोवा) येथे हलविण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरव यांनी दिली.
या अपघातप्रकरणी पोलीस पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.
Source link



