मालवणमध्ये सिंगल यूज प्लास्टिकविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई; 4,300 रुपयांचा दंड,8 किलो प्लास्टिक जप्त

मालवण / प्रतिनिधी : पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ, प्लास्टिकमुक्त शहराच्या उद्देशाने मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून शहर हद्दीत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकविरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान शहरातील आठवडा बाजारातील फेरीवाले व विविध आस्थापनांची तपासणी करण्यात आली. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर अथवा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत संबंधितांकडून 4 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सुमारे 8किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले.
कारवाईदरम्यान व्यापारी व व्यावसायिकांना शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्लास्टिक पिशव्या, कप, प्लेट, चमचे तसेच इतर एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा वापर आणि विक्री टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
मालवण शहर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून यापुढेही अशा तपासण्या व कारवाया नियमितपणे सुरू राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेकडून देण्यात आला.
नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी प्लास्टिकमुक्त शहराच्या मोहिमेत सहभागी होऊन नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
Source link



