Solapur Accident | मुलांच्या भांडणात मोठ्यांचा राडा; मध्यस्थी करणाऱ्या मामाचा मारहाणीत मृत्यू

सोलापूर -शहरातील होटगी रोडवरील मजरेवाडी परिसरातील लोकमान्य नगरात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असून मृत व्यक्तीच्या नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
अल्ताफ बाशा शेख (वय ४५, रा. लोकमान्य नगर मजरेवाडी, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर या हाणामारीत सोफियान इर्शाद शेख (वय २०, रा. लोकमान्यनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राहत्या घरासमोर लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन सोफियान शेख याच्याशी मुजेब वहाब सय्यद याच्याशी तक्रार चालू होती. त्यावेळी सोफियान याचे मामा अल्ताफ शेख हे तक्रार सोडविण्यासाठी गेले असता त्यांना तू का मध्ये पडतोस असे म्हणून मुजेब सय्यद, सोहेब वहाब सय्यद व इतर दोघांनी मिळून लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत अल्ताफ शेख यांच्या तोंडाला व सर्वांगास मुकामार लागल्याने ते जागीच बेशुध्द झाले. त्यामुळे त्यांना बेशुध्दावस्थेत नातेवाईक सादिक शेख यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉ क्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या बाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तींचा शोध विजापूर नाका पोलिसांकडून घेतला जात आहे.
अज्ञात कारणावरून महिलेस मारहाण
वनमाला दिलीप माळी (वय ४५, रा. कवे) असे जखमी महिलेचे नाव आहे. २९ ऑगस्ट रोजी राहत्या घरासमोर अज्ञात कारणावरून वनमाला माळी या महिलेस महेश बाजीराव काळे, मयुर बाजीराव काळे व इतर तीन जणांनी मिळून काठीने, उसाने, लोखंडी रॉडने तसचे लाथाबुक्क्याने मारहाण केली. यामध्ये वनमाला यांच्या सर्वांगास मार लागल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
Source link



