Uncategorized

पर्वरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे 9 सप्टेंबरला उद्घाटन; 11 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला; मंत्री दिगंबर कामत

पणजी : गोव्याच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी पर्वरी सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी पणजीतील आल्तिन्यु येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत माहिती दिली.

कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार,9 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. यापूर्वी उद्घाटनासाठी 10 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती; मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या वेळापत्रकानुसार ती एक दिवस आधी करण्यात आली आहे.

उद्घाटनानंतर 11 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता हा एलिव्हेटेड कॉरिडॉर सर्वसामान्यांच्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या अवघ्या दोन दिवस आधी हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याने उत्तर गोव्याकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दोन दिवस नागरिकांना पुलावर फिरण्याची संधी

उद्घाटनापूर्वी 7 आणि 8 सप्टेंबर रोजी नागरिकांना या एलिव्हेटेड कॉरिडॉरवर पायी चालण्याची तसेच सेल्फी काढण्याची विशेष परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्घाटनापूर्वीच नागरिकांना या नव्या मार्गाचा अनुभव घेता येणार आहे.

641 कोटींचा, 5.15 किमी लांबीचा प्रकल्प

पर्वरी एलिव्हेटेड कॉरिडॉर हा सुमारे 641 कोटी रुपये खर्चाचा आणि 5.15 किलोमीटर लांबीचा सहापदरी प्रकल्प आहे. पणजी ते उत्तर गोवा दरम्यानची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः पर्वरी परिसरातील वाहतूक कोंडीवर यामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

उद्घाटन सोहळा पर्वरी येथील मॅजेस्टिक हॉटेलच्या बाजूला, एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या प्रारंभिक ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी जाहीर प्रवेश म्हापसा-गौरीम बाजूने ठेवण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री कामत यांनी दिली.

पर्वरीतील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणाऱ्या या प्रकल्पाकडे गोवेकरांचे लक्ष लागले असून, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रवास अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​