आचरा, कोटकामते देवस्थानच्या पाठपुराव्याला यश

आचरा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी २०२४ मध्ये ॲग्री स्टॅक योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आयडी तयार करून भविष्यातील विविध शासकीय कृषी योजना व सुविधा या आयडीशी संलग्न करून राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, सातबारा उताऱ्याच्या ‘इतर अधिकार’ सदरी कुळ इत्यादी म्हणून नोंद असलेल्या अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तांत्रिक कारणांमुळे तयार होत नव्हते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
हा प्रश्न केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनाही या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी यापूर्वीही विविध स्तरावर प्रयत्न झाले होते; मात्र त्याला अपेक्षित यश मिळाले नव्हते.
या पार्श्वभूमीवर इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान, कसबा आचरे आणि इनामदार श्रीदेवी भगवती संस्थान, कोटकामतेच्या विश्वस्तांनी पुढाकार घेत हा प्रश्न पुन्हा शासनाच्या निदर्शनास आणून दिला. दोन्ही संस्थांच्या विश्वस्तांनी पालकमंत्री मा. श्री. नितेश राणे यांची भेट घेऊन या समस्येचे गांभीर्य, शेतकऱ्यांची अडचण आणि त्यावरील संभाव्य परिणाम याबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात घेऊन पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी तातडीने हा विषय मा. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिला आणि प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर महसूल विभागाने याबाबत सकारात्मक निर्णय घेत संबंधित तांत्रिक व इतर अडचणी दूर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
या निर्णयामुळे सातबारा उताऱ्याच्या ‘इतर अधिकार’ सदरी नोंद असलेल्या शेतकऱ्यांसह सातबारा सदरी नोंद नसलेल्या व इतर पात्र शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी तयार करण्याचा मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यातील विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा ठरणार असल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या निर्णयासाठी पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडचण गांभीर्याने घेऊन हा विषय तातडीने मार्गी लावल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आभार मानण्यात येत आहेत.
या संपूर्ण प्रयत्नांना चालना देण्यासाठी इनामदार श्रीदेवी भगवती संस्थान, कोटकामतेचे विश्वस्त श्री. गुरुदास घाडी व डॉ. मुकुल प्रभुदेसाई, तसेच इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान, कसबा आचरेचे विश्वस्त ऍडव्होकेट शिल्पन गांवकर, संजय मिराशी व संतोष मिराशी यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी . प्रदीप परब मिराशी व कपिल गुरव विश्वस्तही उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व आमदार श्री. दीपक केसरकर उपस्थित असलेल्या या बैठकीत देवस्थानच्या विश्वस्तांनी हा प्रश्न मांडला. यामुळे या प्रलंबित प्रश्नाला पुन्हा चालना मिळाली आणि अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने देवस्थानच्या या प्रयत्नांना यश आल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रश्न मार्गी लागल्याने दोन्ही देवस्थानच्या विश्वस्तांचेही शेतकरी बांधवांकडून विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
Source link



