नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला

नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर गुरुवारी नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. नांदेड येथील माता साहिब गुरुद्वारा परिसरात हा हल्ला झाला. या घटनेनंतर बादल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वाराकडे जात असताना सकाळी साडेअकराच्या सुमारास एक व्यक्ती बादल यांच्या जवळ आला आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत हल्लेखोराला रोखले. मात्र, या घटनेत बादल यांच्या हाताला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यालाही दुखापत
हल्ल्यावेळी बादल यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
घटनेनंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सुखबीर सिंह बादल एका इमारतीत जाताना दिसत असून, त्यांच्या उजव्या हाताला कापड बांधलेले असल्याचे दिसते.
पत्नी हरसिमरत कौर बादलही होत्या सोबत
हल्ल्याच्या वेळी सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल उपस्थित होत्या. दोघांनी गुरुवारी नांदेड येथील तख्त श्री हजूर साहिब येथे दर्शन घेतले होते. त्यानंतर गुरुद्वाराच्या परिसरात ही घटना घडली.
भाजपकडून हल्ल्याचा निषेध
पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंह ढिल्लों यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. पवित्र तख्ताच्या परिसरात हिंसाचाराला कोणतेही स्थान नसल्याचे त्यांनी म्हटले असून, बादल यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
२०२४ मध्येही झाला होता हल्ला
सुखबीर सिंह बादल यांच्यावर यापूर्वी ४ डिसेंबर २०२४ रोजी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्या घटनेत बादल बचावले होते. हल्लेखोराला पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले होते.
नांदेडमधील ताज्या घटनेनंतर सुखबीर सिंह बादल यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपीची पार्श्वभूमी तपासातून स्पष्ट होणार आहे.
Source link



