भरधाव कार दुभाजकावर आदळून पलटी; ट्रकला धडकली, पुणे जिल्ह्यातील चार तरुण ठार

शिरवळ : पावसाळी पर्यटनासाठी महाबळेश्वरकडे निघालेल्या तरुणांच्या कारचा पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार प्रथम रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर कार तीन ते चार वेळा पलटी होऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शिरवळ गावच्या हद्दीत मंगळवारी (११ ऑगस्ट) रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील सहा तरुण कारमधून पावसाळी पर्यटनासाठी महाबळेश्वरच्या दिशेने निघाले होते. शिरवळ गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर कार चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव कार दुभाजकाला धडकून तीन ते चार वेळा पलटी झाली. त्यानंतर समोरून येणाऱ्या मालट्रकला कारची जोरदार धडक बसली. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात वेदांत अर्जुन वारिंगे (१९, तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९, कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, टाकवे) आणि निखील बाळू राऊत (२०, कामशेत) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीक्षित दयानंद पुजारी (२०, कामशेत) आणि कारचालक मयूर हनुमंत शिंदे (२०, बऊर, कामशेत) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर कारमध्ये मृतदेह अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे, शिरवळ पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सारोळा महामार्ग मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत पडळकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरवळ रेस्क्यू टीमच्या मदतीने कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या अपघातात कार (एमएच १४ एलजे ३०३३) आणि मालट्रक (केए २७ सी ५८७८) यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
Source link



