स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात वायरी ग्रामस्थ आक्रमक

मालवण, ता. १० : महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसविण्याच्या कार्यवाही विरोधात वायरी-भूतनाथ गावातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले. “आम्ही कुठच्याही परिस्थितीत गावात स्मार्ट मीटर बसवू देणार नाही!” असा ठाम निर्धार वायरी-भूतनाथ येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनासमोर आपले प्रमुख आक्षेप नोंदवले. यात ज्या ठिकाणी हे मीटर बसवण्यात आले आहेत, तेथे दुप्पट-तिप्पट बिल येत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून पुढे जाऊन ‘प्रिपेड सिस्टीम’ लागू होण्याची भीती असून ही पद्धत अन्यायकारक ठरेल. सध्याचे डिजिटल मीटर्स सुरळीत सुरू असताना नवीन मीटर सक्तीने बसवण्याची कोणतीही गरज वाटत नाही.
ग्रामस्थांच्या इच्छेविरुद्ध किंवा सक्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता सचिन मेहेत्रे यांनी महावितरणची बाजू मांडताना सांगितले की, ही केंद्र शासनाची योजना असून याद्वारे ‘टाईम ऑफ द डे’ नियमावली लागू करायची आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्मार्ट मीटर अतिशय महत्त्वाचे असून कुठे शॉर्टसर्किट झाल्यास ते तत्काळ दर्शवते. तसेच यामुळे अचूक बिल मिळण्यास मदत होते. आतापर्यंत ७,४०० जणांनी स्मार्ट मीटर बसवले असून हे मीटर सर्वांच्या फायद्याचेच आहेत.
या आंदोलनात सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगावकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तेजस लुडबे, देवानंद लुडबे, देवानंद लोकेगावकर, मनोज लुडबे, संजय लुडबे, पराग माणगावकर, विश्वास लुडबे, एकनाथ फणसेकर, गणपत म्हसकर, राजाराम माडये, आनंद गावडे, समीर तळगावकर, दर्शन वेंगुर्लेकर, प्रकाश सावंत, गणेश परब, दीपक कुडाळकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link



