नारळ लढवणे’ परंपरेला अमृर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा द्या; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदन

मालवण : कोकणातील नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शतकानुशतके जपली गेलेली ‘नारळ लढवणे’ ही पारंपरिक लोकपरंपरा महाराष्ट्राच्या अमृर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा देऊन तिला राज्य शासनाची अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक तथा भाजपचे रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनीही पाठपुरावा सुरू केला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील विविध कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी ‘नारळ लढवणे’ हा पारंपरिक प्रकार अनेक शतकांपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा केवळ उत्सव नसून कोकणच्या लोकजीवनाशी आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला एक महत्त्वपूर्ण अमूर्त सांस्कृतिक वारसा आहे. योग्य नारळाची निवड, अचूक निशाणा आणि विशिष्ट तंत्राने नारळ लढवण्याचे कौशल्य ही या परंपरेची वैशिष्ट्ये आहेत.
सध्या या परंपरेला युवक आणि पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांसाठीही स्वतंत्र नारळ लढवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे या लोकपरंपरेचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या परंपरेला राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यास तिचे शासकीय संरक्षण होईल, पर्यटनाला मोठी चालना मिळेल तसेच राज्यस्तरीय स्पर्धांद्वारे युवक आणि महिलांमध्ये या कौशल्याधारित पारंपरिक प्रकाराबाबत अधिक आकर्षण निर्माण होईल, असा विश्वास रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केला आहे.
‘नारळ लढवणे’ या ऐतिहासिक परंपरेचा राज्य शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन कॅलेंडरमध्ये समावेश करून तिला आवश्यक ते शासकीय प्रोत्साहन द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्गचे पालकमंत्री, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. निलेश राणे तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
Source link



