Uncategorized

कलंबिस्त येथील बिअर शॉपी बंद करण्याची मागणी; अन्यथा १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

सावंतवाडी | प्रतिनिधी : कलंबिस्त गावातील बिअर शॉपी तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच परिसरातील अवैध दारूधंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले असून, नायब तहसीलदार मनोज मुसळे तसेच पोलीस विभागाला देण्यात आले आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास १५ ऑगस्टपासून प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पास्ते, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते विजय कदम, ज्येष्ठ ग्रामस्थ बाबू सावंत, निखिल सावंत, काशीराम म्हाडगुत आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कलंबिस्त ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारूविक्री सुरू असून, खोटा ग्रामपंचायत ठराव तयार करून बिअर शॉपीला परवानगी देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव मंजूर केला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच, बिअर शॉपी बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात २५ जून रोजी ग्रामपंचायतीत दारूबंदी विषयावर विशेष ग्रामसभेत चर्चा झाली होती. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करून संबंधित बिअर शॉपीस परवानगी मिळविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभेला केवळ १८ सदस्य उपस्थित असताना कागदपत्रांवरील सर्व सह्या खोट्या असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, कोणताही ठराव मंजूर होण्यापूर्वीच ‘ना हरकत’ दाखला देण्यात आल्याचे कागदोपत्री दिसून येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सदर बिअर शॉपी बेकायदेशीर असून, गावातील तसेच पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी आणि काही युवक त्याकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे गावासह परिसरात वाद, भांडणे आणि सामाजिक तणाव वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

म्हणूनच संबंधित बिअर शॉपी तात्काळ बंद करण्यात यावी, परिसरातील अवैध दारूधंद्यांवर कारवाई करावी आणि कलंबिस्तसह पंचक्रोशीतील गावे दारूमुक्त घोषित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच, बिअर शॉपीला परवानगी देण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर आणि संबंधित प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​