Uncategorized

‘मातीशिवाय शेती’चे स्वप्न साकार!

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची अभिनव भरारी

मनोज पवार

दापोली

कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना उत्तर देणाऱ्या संशोधनातून समाजाला नवे पर्याय उपलब्ध करून देण्याची परंपरा जपणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मातीशिवाय, कमी जागेत, अत्यल्प पाण्यात आणि पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने वर्षभर ताजा, पौष्टिक व रसायनमुक्त भाजीपाला पिकवणारे स्वयंचलित घरगुती हायड्रोपोनिक युनिट विद्यापीठाने विकसित केले आहे. याकरिता विद्यापीठाला भारत सरकारकडून पेटंट बहाल करण्यात आले आहे. पुढील 20 वर्षांसाठी वैध असलेले हे ‘पेटंट’ केवळ संशोधनाची दखल नसून भारतीय कृषी तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची नोंद मानली जात आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाने विकसित केलेले हे तंत्रज्ञान शहरीकरण, पाणीटंचाई आणि सुरक्षित अन्नाची वाढती गरज या तीन महत्त्वाच्या प्रश्नांना एकाचवेळी उत्तर देणारे ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली, संतुलित पोषक द्रावण आणि विशेष ग्रोइंग मिडिया यांच्या प्रभावी संगमातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या संशोधनामध्ये विभागाचे माजी विभागप्रमुख व माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. उत्तम कदम, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील पाटील आणि विभागप्रमुख डॉ. प्रवीण इंगळे यांनी मोलाचे संशोधनात्मक योगदान दिले आहे. या संपूर्ण प्रकल्पाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. विजयकुमार तोरणे, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीपकुमार जैन यांनी आवश्यक शैक्षणिक व प्रशासकीय सहकार्य केले. संशोधनासाठी लागणारा निधीही विद्यापीठाने उपलब्ध करून दिला.

अवघ्या 0.65 चौरस मीटर जागेत उभारणी

या स्वयंचलित हायड्रोपोनिक युनिटची सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे ते अवघ्या 0.65 चौरस मीटर जागेत उभारता येते. सिंचन, प्रकाश व्यवस्था आणि निचरा प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असून कोकोपीठ आणि गांडुळ खताचा माध्यम म्हणून वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कमी श्रम, कमी पाणी आणि अत्यल्प जागेत वर्षभर दर्जेदार भाजीपाल्याचे उत्पादन घेणे शक्य होते. सुमारे 40 हजार ऊपये किंमतीचे हे युनिट भविष्यात शहरी घरे, टेरेस गार्डन तसेच ग्रामीण भागातील लहान कुटुंबांसाठी अत्यंत उपयुक्त पर्याय ठरू शकते.

‘होम टू प्लेट’ नवी संकल्पना

वाढते शहरीकरण, घटती शेतीयोग्य जमीन, हवामान बदलाचे संकट आणि रसायनमुक्त अन्नाची वाढती मागणी या पार्श्वभूमीवर हे संशोधन विशेष महत्वाचे ठरते. घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा अंगणातील छोट्याशा जागेत सुरक्षित आणि ताजा भाजीपाला पिकवण्याची संकल्पना या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्षात उतरू शकणार आहे. त्यामुळे ‘फार्म टू फोर्क’ ही संकल्पना आता थेट ‘होम टू प्लेट’ या नव्या स्वरुपात साकारण्याची क्षमता या संशोधनात आहे. भारतीय शेतीला तंत्रज्ञानाची नवी दिशा देणारे आणि भविष्यातील शाश्वत अन्नसुरक्षेला बळकटी देणारे हे संशोधन दापोलीच्या मातीतून देशाला मिळालेली एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक देणगी ठरत आहे.

राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची ओळख अधिक भक्कम

कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने विकसित केलेले हे स्वयंचलित घरगुती हायड्रोपोनिक युनिट नागरिकांना विषमुक्त आणि ताजा भाजीपाला पिकवण्याचा किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणारे आहे. या संशोधनामुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून राज्य आणि देशपातळीवर विद्यापीठाची ओळख अधिक भक्कम झाली आहे.

-डॉ. संजय भावे, कुलगुरू – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली.

 

 

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​