Powerful earthquake in Japan

क्युशू-कुमामोटोमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : सुनामीचा इशारा
वृत्तसंस्था
टोकियो
जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेट क्युशूमध्ये मंगळवारी दुपारी 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्यामुळे संपूर्ण प्रदेशात जोरदार हादरे बसले. जपान हवामानशास्त्र संस्थेनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू कुमामोटो प्रांतात सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपानंतर लगेचच प्रशासनाने किनारपट्टीच्या भागांसाठी सुनामीचा इशारा जारी करत रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. किनारपट्टीच्या भागातील रहिवाशांना विलंब न करता सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आणि अधिकृत स्थलांतर सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत सुनामी न आल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
भूकंपानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बुलेट ट्रेन सेवा थांबवल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली. नैर्त्रुत्य जपानमधील फुकुओका येथील जेआर हाकाता स्टेशनवर मोठ्या संख्येने प्रवासी अडकून पडले होते. शक्तिशाली भूकंपात 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच 48,300 हून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. भूकंपामुळे अनेक भागांतील रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. आग लागल्याच्या आणि जखमी झाल्याच्याही बातम्या आहेत. बाधित भागांमध्ये बचाव आणि मदत पथके तैनात करण्यात आली असून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.
जपान हवामानशास्त्र संस्थेनुसार, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कुमामोटोमध्ये 4.2 तीव्रतेचा एक आफ्टरशॉक (भूकंपानंतरचा धक्का) जाणवल्याचे जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव, मिनोरू किहारा यांनी मंगळवारी संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत सांगितले. जपान सरकारने क्यूशू बेटाच्या सात प्रमुख प्रांतांसाठी भूकंपाचा आणीबाणीचा इशारा जारी केला होता. त्यात कुमामोतो, नागासाकी, कागोशिमा, फुकुओका, सागा, ओइता आणि मियाझाकी यांचा समावेश होता.
Source link



