Uncategorized

Ashadhi wari 2026 माऊलींच्या मानाच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना

पुणे : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी रविवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करून गणरायाला अनोखी मानवंदना दिली. “माऊली माऊली”, “ज्ञानोबा माऊली तुकाराम” आणि “गणपती बाप्पा मोरया” अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने मानाच्या अश्वांचे विधिवत पूजन करण्यात आले. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीचे हे अश्व दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उर्जितसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार) आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणरायाची भेट ही शुभ परंपरा

उर्जितसिंह शितोळे (सरकार) यांनी सांगितले की, माऊलींचे मानाचे अश्व आणि गणरायाची भेट ही अत्यंत शुभ परंपरा आहे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करून हे अश्व वारीत सहभागी होतात. गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर हे अश्व आळंदीकडे प्रस्थान करतात. ही परंपरा अखंडपणे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले की, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. वारीत सहभागी होऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी मानाच्या अश्वांचे दर्शन हा श्रद्धेचा आणि भक्तीचा महत्त्वाचा क्षण असतो. गेल्या अनेक वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत असून ही परंपरा यंदाही उत्साहात पार पडली.

कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, ट्रस्टतर्फे दरवर्षी वारीदरम्यान मोफत रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा, हरित वारी, स्वच्छता अभियान आदी विविध उपक्रम राबविले जातात. या सेवा उपक्रमांची सुरुवात मानाच्या अश्वांच्या आगमनाने होत असून वारकऱ्यांच्या सेवेसाठी ट्रस्ट सातत्याने कार्यरत राहणार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​