Uncategorized

पंजाब काँग्रेसमधील गटबाजी उघड

राजा वडिंग विरोधात चन्नी गट  : रंधावा यांनी घेतली शाह यांची भेट

वृत्तसंस्था, चंदीगड

पंजाब काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलानंतर सुरू झालेली अंतर्गत चढाओढ आता शक्तिपरीक्षेत बदलत असल्याचे दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष अमरिंदर राजा वडिंग यांच्यासंबंधीचा असंतोष समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या निवासस्थानी सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या गटाचे नेते एकवटले आणि त्यांनी पक्षनेतृत्व आणि खासकरून राजा वडिंग यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले.

या पूर्ण घटनाक्रमाने पंजाब काँग्रेसमध्ये आता लढाई केवळ पदांची नव्हे तर 2027 मधील नेतृत्वावरून असल्याचे स्पष्ट झाले आहे. चन्नी यांना काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष करण्यात आल्यापासून त्यांचे समर्थक नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते तरसेम सिंह डीसी यांनी थेट राजा वडिंग यांच्यावरच निशाणा साधला आहे. राजा वडिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेस सरकार स्थापन करू शकत नाही, कारण जनता वडिंग यांचे समर्थन करत नाही.  लोक चन्नी यांना राज्याचा पुढील मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात असा दावा तरसेम सिंह यांनी केला आहे.

वडिंग विरोधात उघड बंड

चन्नी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपस्थित अनेक नेते आणि माजी आमदारांनी राजा वडिंग यांना संघटनेची धुरा दिली जाऊ नये अशी मागणी केली. पक्षश्रेष्ठींनी वडिंग यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवत चुकीचा संदेश दिल्याचा सूर या बैठकीत उमटला आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट

काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी दिल्ली दौरा केला.. सूत्रांनुसार रंधावा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे. यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

या घटनेला काँग्रेसमधील असंतोषाचा मोठा संकेत म्हणून पाहिले जातेय.

काँग्रेसमध्ये अनेक गट

एकीकडे पक्ष संघटनेवर राजा वडिंग यांची पकड आहे, तर दुसरीकडे चन्नी स्वत:चा जनाधार आणि दलित समीकरणे समोर ठेवत आहेत. याचबरोबर खासदार मनीष तिवारी आणि रंधावा यांच्यासारखे नेते वेगळा दबाबगट निर्माण करत असल्याचे चित्र आहे. पक्षश्रेष्ठींनी लवकर हस्तक्षेप न केल्यास पंजाब काँग्रेसमधील हा असंतोष खुल्या बंडात रुपांतरित होऊ शकतो.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​