राधानगरी धरणस्थळी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

राधानगरी ( महेश तिरवडे ) – सामाजिक न्याय, शिक्षण, शेती व लोककल्याणाच्या कार्यातून जनतेच्या मनावर छाप उमटविणारे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त राधानगरी धरणस्थळी राजर्षी शाहू स्मृती समाधी केंद्राच्या वतीने अभिवादन करण्यात आले.राधानगरी धरण परिसरातील राजर्षी शाहू स्मृती समाधी केंद्रात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस व स्मृतीस्थळास जि प सदस्य अभिजीत तायशेटे यांनी कलश व जलपूजा करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी लोकराजा शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा व कार्याचा आढावा घेतला. शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्था उभी करणे या शाहू महाराजांच्या कार्याला त्यांनी उजाळा दिला. त्यांच्या विचारांनी उपस्थितांची मने जिंकली,
यावेळी राधानगरी धरणस्थळी असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील विविध मान्यवरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यामध्ये दाजीराव विचारे, महाराणी लक्ष्मीबाई उर्फ आईसाहेब, महाराणी राधाबाई उर्फ अक्कासाहेब, पिराजीराव घाटगे, राजाराम महाराज तसेच राधानगरी धरण निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टीने उभारलेले राधानगरी धरण हे त्यांच्या लोककल्याणकारी विचारांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे जयंतीनिमित्त धरणस्थळी झालेल्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.या कार्यक्रमास राजर्षी शाहू स्मृती केंद्राच्या अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, पोलीस निरीक्षक अजित सिद्, तहसीलदार अनिता देशमुख, उपकार्यकारी अधिकारी प्रवीण पारकर, मंडल अधिकारी सीमा मोरये, सचिन भाटळे, वीरेंद्र मंडलिक,फेजीवडे सरपंच प्रतिभा कासार,संदीप पाटील,रमेश बचाटे, दादाजी सांगावकर, चंद्रकांत चौगुले, शिवाजी चौगुले, बशीर राऊत तसेच मोठ्या संख्येने शाहूप्रेमी नागरिक उपस्थित होते.
Source link



