कागल तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

मुरगूड : कागल तालुक्यातील यमगे आणि मूरगुड येथे बंद घरे हेरून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी तिजोरी उचकटून तब्बल साडे आठ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, यमगेतील महादेव लोकरे हे आपल्या पत्नीसह भाऊबंदातील एका लग्न समारंभासाठी पुणे येथे गेले होते. त्यांची मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने घर सलग दोन दिवस बंद होते. अज्ञात चोरट्यानी घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून २ तोळे सोन्याचे गंठन, २ तोळे सोन्याची चेन, आडीच तोळे सोन्याचा लक्ष्मीहार, अर्धा तोळे सोन्याची चेन, आर्धा तोळे सोन्याचे गुंड, ताट तांब्या आरती समई ग्लास ही ८०० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी तसेच ६० हजार रु. रोकड असा एकूण ७ लाख ५७हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
चोरीची माहिती मिळताच लोकरे दांपत्य घरी परतले. त्यानंतर त्यांनी रवतः मुरगुड पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद नोंदवली.दरम्यान, मुरगूड येथील बिद्री साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्या बंद घरालाही चोरट्यानी लक्ष्य केले. चौगले हे कुटुंबीयांसमवेत काही दिवस कामानिमित्त बारामतीला गेले होते. रात्री घरी परतल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार समजला. बंगल्यामधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केला.
चोरट्यानी घराच्या मागील बाजूने प्रवेश करून सर्व खोल्यांमधील दरवाजे तोडून प्रवेश करून सर्व लॉकर्स तोडले होते. साहित्य विरकटून हाताला लागेल तो ऐवज चोरट्यानी लंपास केला. सर्वच दागिने व ऐवज बँकांच्या लॉकरमध्ये ठेवल्यामुळे सुरक्षित राहीला. घरातून अंदाजे १० हजाराची रोकड लंपास झाल्याचे समजते. घरामध्ये ठेवलेल्या धान्यामध्ये देखील चोरट्यांनी दागिन्यांचा शोध घेतला. मुरगडातील या चोरीची पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद नव्हती.
Source link



