Japan on the verge of reaching the knockout stage; Tunisia

वृत्तसंस्था, माँटेरी, मेक्सिको : ‘गट एफ’मधील सामन्यात ट्युनिशियाचा 4-0 असा धुव्वा उडवत जपानने सलग चौथ्यांदा विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. त्यांच्या अयासे उएदाने दोन गोल केले, तर दाइची कामादा आणि जुनया इतो यांनी प्रत्येकी एक गोल करत जपानला नेदरलँड्सच्या बरोबरीने चार गुणांवर आणून ठेवले. दोन सामन्यांत जपानपेक्षा एक गोल अधिक केल्यामुळे नेदरलँड्सचा संघ सध्या गटात अव्वल स्थानावर आहे.
सामना सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतरही जपानने ट्युनिशियाच्या विस्कळीत बचावावर दबाव कायम ठेवला. या पराभवामुळे ट्युनिशिया स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जपानचे गटातील किमान तिसरे स्थान निश्चित झाले आहे, जे बाद फेरीत जाण्यासाठी पुरेसे ठरू शकते. स्वीडनविऊद्ध 5-1 अशा मानहानिकारक पराभवाला तोंड द्यावा लागलेला सदर उत्तर आफ्रिकन देश जपानच्या वेगवान आक्रमणाला रोखू शकला नाही किंवा स्वत:साठी गोल करण्याच्या स्पष्ट संधीही निर्माण करू शकला नाही.
‘क्रिस्टल पॅलेस’चा मिडफिल्डर असलेल्या कामादाने केटो नाकामुराच्या क्रॉससाठी योग्य जागा पकडली होती आणि स्पर्धेतील आपला दुसरा गोल करण्यासाठी त्याला फारशी हालचालही करावी लागली नाही. 31 व्या मिनिटाला उएदाला मिडफिल्डमध्ये चेंडू मिळाला आणि त्याने ट्युनिशियाच्या ‘बॉक्स’च्या दिशेने आगेकूच केली. पुढे धावणाऱ्या सहकाऱ्यांना चेंडू पास न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोलची संधी हुकल्यासारखे याप्रसंगी वाटत होते. मात्र 27 वर्षीय खेळाडूने ‘बॉक्स’च्या बाहेरून मारलेला तिरकस फटका थेट गोलच्या डाव्या कोपऱ्यात विसावला आणि गोलसंख्या 2-0 अशी झाली.
69 व्या मिनिटाला उएडाने दिलेल्या ‘फ्लिक’मुळे जुनया इतो हा ट्युनिशियाचा गोलरक्षक आयमेन दाहमेन याच्या थेट समोरासमोर उभा ठाकला. त्याने शांतपणे या संधीचे गोलमध्ये रूपांतर करून जपानसाठी तिसरा गोल नोंदवला. 83 व्या मिनिटाला उएदाने आपला दुसरा गोल केला. त्याने मारलेला उत्कृष्ट ‘लूपिंग हेडर’ थेट जाळीत गेला आणि जपान संघाच्या प्रभावी कामगिरीवर त्याने कळस चढवला. 2019 पासून युरोपियन प्रतिस्पर्ध्याविऊद्ध 90 मिनिटांच्या खेळात पराभव न स्वीकारलेला जपानचा संघ आता डॅलास येथे स्वीडनविऊद्ध खेळणार आहे. त्याच वेळी कॅन्सस सिटी येथे ट्युनिशियाचा सामना नेदरलँड्सशी होईल.
विश्वचषकातील 1000 व्या सामन्यात जपानची छाप
पुऊषांच्या विश्वचषकातील हा 1,000 वा सामना होता आणि त्यात जपानने हा महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. जपानच्या संघाने विश्वचषकाच्या एखाद्या सामन्यात केलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक गोल आहेत. पहिल्या सामन्यानंतरच आपल्या प्रशिक्षकाला काढून टाकणाऱ्या पहिल्या संघाचा म्हणजेच ट्युनिशियाचा जपानने सहज पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला कामादाने पहिला गोल केला. जपानच्या विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वांत जलद गोल ठरला.
Source link



