आमच्या जमिनींचो ‘गर्भपात’ आम्ही उघड्या डोळ्यांनी बघूचो ?

उपसंपादक मंगल नाईक -जोशी यांचो खास लेख
सावंतवाडी –
देवाची झाडापेडा मुळासकट उपटून, हिरये डोंगर बोडके करून आणि जमीन खणान तिच्या पोटातलो ‘गर्भ’ जबरदस्तीन काढण्यापर्यंतचो माणसान घातललो घाट आता आमच्या मालवणी माणसापर्यांत येवन पोचलो आसा. मालवणी माणसाच्या हृदयाकच हात घालण्यातगात मजल गेली असताना आमच्या मालवणी शब्दांनी ‘कामराणा पांघरान वगी रवणा’ ह्या आमकाच परवडणारा नाय. ह्येचा कारण, खयच्याच गावातली झाडापेडा काढून गावाची धुळधाण करणाऱ्यांका आमच्या आज्या- पणज्यांनी ‘नियत बिगाडलली माणसा’ असाच म्हटला असता!! ह्येंका आता खरेपणाचा भान देवची गरजच निर्माण झाली आसा!
‘शहाण्याला शब्दांचा मार’ अशी मराठी भाषेत एक सुंदर म्हण आसा. देशाचो स्वातंत्र्यलढो आसो, महाराष्ट्राचो मुक्तिलढो आसो, त्या काळात शब्दांची ताकद, शब्दांची धार सगळ्यांनी पुरेपुर आजमावलंली आसा. शांतपणात झरझरणाऱ्या ह्या शब्दांनी आता हातात ‘बोरू’ घेवची गरज निर्माण झाली आसा. म्हणानच, हो लहानसो प्रयत्न.
आज नाय तर केव्वाच नाय!
कोकणाच्या पार तळाक सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातली आजगाव, धाकोरा, मळेवाड, सखैलखोल, आरवली, सोन्सुरा, अणसुर पाल, आसोली ह्या गावांकडे मायनिंगवाले वळले. आजगावात येवन ह्या जमिनीच्या पोटात ‘काय’ आणि ‘खय’ आसा, त्येचो शोध घेण्यासाठी कंपनीन माणसा धाडली. ही माणसा ‘ड्रोन सर्वेक्षण’ करूक लागली. गावात कानाकानात गोष्ट पोचली, आणि रागाचा उद्रेक झालो. ह्येचा कारण, आमच्या गावात मायनिंग नको, अशे स्पष्ट ठराव ग्रामसभेन घेवन सरकाराक कळवलेले आसत. असा असताना ते ठराव धुडकावन लावन सर्वेक्षण करणा, ह्या आमच्या कोकणवासी माणसाक सहन होणाराच नाय आसा. राज्यघटनेच्या ७३ व्या घटनादुरूस्तीन ग्रामसभेक प्रचंड मोठे अधिकार दिल्ले असतानासुधा ही हिंमत होताच कशी? आजगावात, अणसुर पालीत सगळे ग्रामस्थ येक झाले. ‘गाव करीत ता रावाक जमाचा नाय’ ह्या दाखवन दिल्यानी. कारण आज नाय तर केव्वाच नाय.
आमच्या जमिनींचो ‘गर्भपात’
आम्ही उघड्या डोळ्यांनी बघूचो?
कोकण म्हणजे साक्षात देवाक पडलेला सुखद स्वप्न आसा,’ असो गौरव आमच्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी केलो. आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेजारचे राज्यकर्ते पैशान, ताकदीन धष्टपुष्ट असताना कठीण स्थितीत ह्या स्वराज्य निर्माण केला. महाराजांनी त्येंचे मनसुबे, ‘गनिमी कावे’ कामात आणताना ह्या डोंगरदऱ्यांनी त्येंका दिलेली साथ किती महत्वाची होती, ह्या वेगळा सांगाक नको! महाराजांनी स्वराज्यातले जमिनी राखल्यांनी. शेतीभातीक ताकद दिल्यानी. डोंगरावरच्या सड्याच्या टापूत मजबूत गड बांधल्यानी. जे गड मुळातच होते, त्येंची दुरुस्ती केल्यानी. त्येंच्यापाठी संभाजीराजांनीसुधा वतनदारीक थार देवक नाय. महाराष्ट्र म्हणजे आमच्या राजांनी घडवलंला, पोसलंला स्वराज्य आसा. हयच्या निसर्गानमहाराजांका साथ दिली. हयच्या जंगलातनी महाराजांच्या, मावळ्यांच्या घोड्यांचे खूर उधाळले आसत. महिने-महिने, वर्षा-वर्षा ह्या डोंगरावरच्या गडांनी दुश्मनांका झुलवत ठेवल्यानी. आज याच कोकणातल्या गावात त्याच जमिनींचो बिनदिक्कत ‘गर्भपात’ करण्याचो घाट घालणाऱ्यांविषयी ग्रामस्थांका चीड येणा स्वाभाविकच नाय काय?
झाडापेडा उपटणारो, धूळधाण करणारो
प्रकल्प ‘विकास’ कसो असात??
कोकणातले हे सगळेच गाव नखशिखान्त सुंदर आसंत. दाटीच्या झाडावेलींनी घट भरलल्या डोंगरांच्या मुळाक अरबी सागराची गाज आयकत ही गावा शांतपणाचा जीवन जगतंत. ह्याच डोंगरांवरच्या रानात कोकणाची वळख असणारी शेतकऱ्यांची काजी, भिरंडा, फणस, आंब्याची झाडा आसत. जगाच्या पाठीवरच्या खयच्याय माणसाक मोह पडात, अशी सुरंगीची फुला ह्या गावागावात सुगंध दितंत. वर्षानुवर्षा हयचो शेतकरी जमिनीवर जीवन जगवत इलो आसा. आमचे जमिनी, आमचे डोंगर म्हणजे आमचा सर्वस्व आसा. आमची जमीन आमची ‘आवस’ आसा. कोरोनात उद्योग बंद पडले तेव्हा, आमच्या चाकरमान्यांकासुधा गावात येवचा लागला. आमच्या याच जमिनीन तेव्हा पोटा भरली आसत. आणि झाडांनी नटानथटान उभे आसणारे डोंगर आणि जमिनींका उघडेबोडके करून जा काय म्हणान करतील, त्येका ‘विकास’ कसो म्हणाक शकतो? आमचो ह्यो पर्यटन जिल्हो आसा. हयच्या नैसर्गिक उत्पादनार काम करणारे उद्योग आमच्याकडे नाय. तर, कोणाचीतरी तुंबडी भरूच्यासाठी आमच्या गावांका नख लावण्याचा शाणपाण कोणय करत आसतीत, तर आम्ही गावकरी चालवन घेवचो नाय, असो निर्धार गावकऱ्यांनी केलो, तर त्यात चुकीचा ता काय?
‘सजीव’ ईश्वरभेटीक ‘निर्जीव’
बघतानाचा दुःख फक्त भूमिपुत्राकच ठावक!
ज्येंका कोणाक कोकणातले ह्ये जमिनी खणान खनिज काढूची इच्छा आसा, आणि जर कोण मायनिंगातून रोजगार मिळतलो म्हणत असात, तर त्येंका बिचाऱ्यांका शेतजमिनींचा महत्व माहीत नाय आसा. अश्मयुगापासून आता ह्या एकविसाव्या शतकापर्यंत हे जमिनी माणसांची पोटा भरतंत. खनिजासाठी जमनी खणाक लागले तर पोटाची भूक भागवक खनिज खातलेत काय? भारताचो लोकसंख्येत पयलो नंबर. जगाच्या तुलनेन भारताची जमीन २.४ टक्के आणि लोकसंख्या १७.५ टक्के आसा. या लोकसंख्येची पोटा भरूक अन्न हव्या की नको? काय आपली सगळीच आयात? खनिजांसाठी शेताभाताचे, अन्नधान्याचे जमिनी ओरबाडले तर पीकपाण्याचा काय? रोजगाराचा बोलाचा तर, मायनिंगची एक नोकरी एकाचा कुटुंब तो माणूस नोकरी करीपर्यंतच जगवतली. पण शेताची जमीन पिढ्यानपिढ्या अनेक कुटुंबांका घास दित इली आसा आणि पुढेय दितली. खनिज म्हणजे संपणारो साठो आसा. उद्या तो संपलो काय उघडेबोडके डोंगर, उद्ध्वस्त जमिनींकडे भुमीपुत्रांनी खयच्या डोळ्यांनी बघायचा? आम्ही माणसांनीच ईश्वराच्या या सजीव भेटीक ‘निर्जीव’ करून सोडलेली बघताना जीवाची काय घालमेल होतली, ती भुमिपुत्राकच ठावूक!
मायनिंगचे परिणाम बघूक खूप लांब जावची गरज नाय आसा. वेंगुर्ला तालुक्यातल्या रेडी गावात थयच्याच भूमिपुत्रांका हक्काच्या पिवच्या पाण्याक मुकाचा लागला. यापेक्षा मोठा दुःख काय असू शकता? समस्या तर यापेक्षाय जास्तीचे आसत.आमचे भूमिपुत्र ह्याच सांगतंत की, कोकणातल्या जमिनीत शेती, लागवड करणा फायदेशीर आसा. ह्या परप्रांतीयांनीसुधा ओळखला. सिंधुदुर्गात जमिनी घेवन ते हय शेती करतंत.. आणि आम्ही मायनिंगची गाजरा खातो!! आमची ही गावा कृषिप्रधान आसत. शेती, बागायती हयचो प्राण आसा. पाणी, हवामान, पावस, निसर्ग या सगळ्याबाबतीत ह्यो भाग समृद्ध आसा. तेव्हा मायनिंगची कुऱ्हाड घेवन येणाऱ्यांनी इल्या पावली माघारी चला!! हेच्यातच तुमचा भला आसा!! तरीय नाय जुमानल्यात तर लक्षात ठेवा, आमचो राखणदार हातात तलवार घेवन सिद्ध आसा.
Source link



