Uncategorized

नीट पुनर्परीक्षेत कोणताही गोंधळ चालणार नाही!

उच्चस्तरीय बैठकीत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची सूचना : अनियमितता होणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी शिक्षण मंत्रालय, राज्य सरकारे, राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) आणि उच्च शिक्षण संस्थांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीदरम्यान, केंद्रीय मंत्री प्रधान यांनी नीट यूजी परीक्षा प्रक्रियेत सचोटी, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचे सर्वोच्च मानक राखण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पूर्णपणे तयार राहण्याचे निर्देश दिले. तसेच पुनर्परीक्षा निष्पक्ष आणि पूर्णपणे पारदर्शक होईल याची खात्री करण्याची सूचनाही केली.

मंत्रालयाने नियुक्त केलेले अधिकारी पुनर्परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कामांमध्ये समन्वय साधण्यासाठी सर्व राज्यांना भेट देतील आणि एनटीएच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखालील कमांड सेंटरला अहवाल सादर करतील, असे मंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सुविधा मिळतील याची खात्री करावी, जेणेकरून ते तणावमुक्त वातावरणात पुनर्परीक्षेला बसू शकतील, असे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीला शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार, उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी आणि एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग हेदेखील उपस्थित होते. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या बैठकीत 222 अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. पेपरफुटीच्या आरोपांनंतर गेल्या महिन्यात घेतलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता 21 जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयात सरकारची भूमिका

दुसरीकडे, सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69अ अंतर्गत ब्लॉकिंग ऑर्डर जारी करण्यात आली होती आणि त्यानंतर टेलिग्रामच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सुनावणी झाली. या प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे सरकारकडे ठोस पुरावे आहेत, असे मेहता यांनी न्यायालयाला सांगितले. काही चॅनेल्स बंद केल्यानंतरही ते नवीन नावांनी पुन्हा सुरू झाले. अनेक चॅनेल्स कथित पेपरफुटीच्या नावाखाली क्यूआर कोडद्वारे पैसे स्वीकारत होते, असेही स्पष्ट करण्यात आले.

22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी

केंद्र सरकारने टेलिग्रामवर 16 जूनपासून 22 जून, 2026 पर्यंत बंदी घातली आहे. या निर्णयामध्ये 21 जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी 2026 पुनर्परीक्षेचा कालावधी आणि त्यानंतरचा एक दिवस समाविष्ट आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या  शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गूगलने आधीच आपल्या प्ले स्टोअरमधून हे अॅप काढून टाकले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​