Kolhapur Crime | पुण्यात विषारी दारू दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; २ दिवसांत ४० गुन्हे दाखल, ३२ जणांना अटक!

विषारी दारू प्रकरणानंतर मोठी कारवाई; 40 गुन्हे, 32 जण अटकेत
पुणे -पुणे येथे विषारी दारूमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात हातभट्टीची वारू निर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. ११ विशेष पथकांनी दोन दिवसांत अवैध दारूसंदर्भात ४० गुन्हे दाखल केले आहेत. ३२ जणांना अटक करून सुमारे ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधिक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष मोहिमेंतर्गत शुक्रवारी आणि शनिवारी जिल्लाभर धडक कारवाया करण्यात आल्या. त्यात हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात ४० गुन्हे नोंदवण्यात आले. तसेच ३२ जणांना अटक केली आहे. तसेच ८ लाख ३३ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही धडक कारवाई मोरेवाडी, मोतीनगर, सरनोबतवाडी, कणेरीवाडी (ता. करवीर), माणगाव, येर्तेरुट्टी (ता. चंदगड), दानोळी (ता. शिरोळ), नेसरी, हेब्बाळ, जल्दीआळ (ता. गडहिंग्लज), बहिरेवाडी, मुमेवाही (ता. आजरा), निगवे-पोहाळे (ता. पन्हाळा), माले, मुडशिंगी, हेरले आणि नागाव (ता. हातकणंगले), करंजफेण (ता. शाहूवाडी), म्हाळुंगे (ता. करवीर), म्हाकवे (ता. कागल) तसेच जाखीणपेठ (ता. भुदरगड) येथे करण्यात आली. दरम्यान, ही विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये १३ टक्के वाढ
एप्रिल आणि मे या २ महिन्यांत उत्पादन शुल्कच्या जिल्हा कार्यालयामार्फत ४६६ गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच ४०० आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल २ कोटी ८८ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गतवर्षाच्या तुलनेत नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये १३ टक्के वाढ झाली आहे.
जप्त मुद्देमालाच्या प्रमाणात तब्बल १२३ टक्के वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक अथवा विक्रीविषयी कोणाकडे माहिती असल्यास ती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ वर कळवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केले आहे.
Source link



